या विधानावर जावेद अख्तर, शान आणि कंगना रणौत यांनी आधीच प्रतिक्रिया दिल्या असताना, आता बॉलीवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री वहीदा रहमान यांनी या वादात उडी घेत रहमान यांना आरसा दाखवला आहे.
वहीदा यांनी रहमान यांना दाखवला आरसा
८७ वर्षांच्या वहीदा रहमान यांनी अत्यंत शांतपणे पण ठामपणे आपली बाजू मांडली. रहमान यांच्या आरोपांबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, "हो, मी त्याबद्दल वाचलंय, पण मी या गोष्टींना फारसं महत्त्व देत नाही. जेव्हा सगळं काही सुरळीत चाललेलं असतं, तेव्हा अशा वादात पडायला मला आवडत नाही. छोट्या-मोठ्या कुरबुरी तर प्रत्येक देशात होतच असतात." वहीदाजींच्या या उत्तरामधून समजतंय की त्यांनी वादापेक्षा शांततेला अधिक महत्त्व दिलं आहे.
advertisement
जातीय भेदभावाच्या मुद्द्यावर बोलताना वहीदा रहमान यांनी रहमान यांना एक मोलाचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, "कोणतं सत्य आहे आणि कशावर विश्वास ठेवावा? हे खरं असलं तरी आपण त्यात का पडावं? किमान माझ्या वयात तरी मला कोणाशीही वाद घालायला आवडणार नाही. शांततेत राहा, हा आपला देश आहे, फक्त आनंदी राहा, मी एवढंच सांगू शकते." देशहित आणि सामाजिक सलोखा हा कोणत्याही वैयक्तिक आरोपापेक्षा मोठा असतो, हेच त्यांनी आपल्या शब्दांतून स्पष्ट केलं.
काम न मिळण्याचं कारण धर्म नाही
वहीदाजींनी रहमान यांच्या आरोपांमागचं व्यावहारिक कारणही सांगितलं. त्यांच्या मते, काम कमी मिळण्यामागे जातीयवाद नसून काळ बदलणं हे मुख्य कारण आहे. त्या म्हणाल्या, "आयुष्यात चढ-उतार तर येतच असतात. एका ठराविक काळानंतर लोक म्हणतात की आता कोणातरी नवीन किंवा वेगळ्या व्यक्तीला संधी द्यायला हवी. जर तुम्ही खूप उंचीवर पोहोचला असाल, तर तुम्ही कायम तिथेच राहाल असं नसतं. हे सगळं नैसर्गिक आहे, यात काहीही नवीन नाही."
रहमान यांनी नक्की काय म्हटलं होतं?
बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत रहमान यांना विचारण्यात आलं होतं की, तमिळ असल्यामुळे तुम्हाला हिंदीत भेदभावाचा सामना करावा लागला का? त्यावर ते म्हणाले होते की, "कदाचित गेल्या आठ वर्षांत सत्ता अशा लोकांच्या हातात गेली आहे जे सर्जनशील नाहीत. हा जातीय मुद्दाही असू शकतो... मला कधीकधी कानावर येतं की, एका कंपनीने मला बुक केलं होतं, पण नंतर त्यांच्याच ५ संगीतकारांना कामावर ठेवलं."
