गेल्या काही दिवसांपासून शहाड उड्डाणपूल हा देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी बंद होता. त्यामुळे कल्याण शहरासह मुरबाड, उल्हासनगर भागातील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कल्याण शहर परिसरात पूल बंद असल्ये मोठी वाहतूक कोंडी होत होती. आता शहाड उड्डाण पुलावरील वाहतूक पूर्ववत झाली असून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
advertisement
शहाड पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर आता कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या आनंद दिखे पुलावरील काम हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असून या काळात पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या काळात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
कल्याण पश्चिमेकडे जाणारी वाहने ही पुना लिंक रस्ता चक्की नाकामार्गे, पुना जुळणी रस्ता श्रीराम चौकमार्गे पुढे जातील.
कल्याण पश्चिमेतील वालधुनी पुलावरून सम्राट चौकमार्गे जाणाऱ्या वाहनांना सम्राट चौक येथे उजवे वळण घेण्यास वाहनांना बंदी असेल. ही वाहने सम्राट चौक येथून सरळ रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, शांती नगर, उल्हासनगर येथून उजवे वळण घेऊन श्रीराम चौक मार्गे पुढे जातील.
उल्हासनगर शहरातून सम्राट चौकमार्गे दिवंगत आनंद दिघे पुलावरून कल्याण पूर्वकडे वाहने येतात. या सर्व प्रकारच्या वाहनांना छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, शांतीनगर येथे प्रवेश बंदी असेल. ही वाहने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथे डावे वळण घेऊन श्रीराम चौकमार्गेच पुढे जातील.






