कर्नाटकमध्ये बुधवारी कोविड-19ची लागण झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. हे मृत्यू JN.1 व्हेरियंटमुळे झाले आहेत का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल आरोग्य विभागाच्या प्रतिनिधींसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पुनरुच्चार केला की, कोविड अद्याप संपलेला नाही. सार्वजनिक आरोग्यासाठी नवीन केसेस, लक्षणे आणि केसेसच्या तीव्रतेवर लक्ष ठेवण्याचं आवाहन त्यांनी राज्यांना केलं.
advertisement
देशातील कोविड रुग्णांच्या वाढत्या ट्रेंडमध्ये देशभरातील रुग्णालये सतर्क आहेत. दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमधील पल्मनरी मेडिसिनचे प्रमुख डॉ. रोहित कुमार म्हणाले, "आम्ही हाय अलर्टवर आहोत, कोविड चाचण्या घेत आहोत आणि जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवत आहोत."
- महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात 41 वर्षांच्या वृद्धाला JN.1 व्हेरियंटची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या रुग्णाबद्दल अधिक तपशील समोर आलेला नाही. पश्चिम बंगाल आरोग्य विभागाने, केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार इन्फ्लुएंझा-सदृश आजार (ILI) आणि गंभीर श्वसन संक्रमणाशी संबंधित (SARI) रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
हरियाणा सरकारने सांगितलं की, इन्फ्लुएंझासारखे आजार आणि गंभीर श्वसन संक्रमण असलेल्या रुग्णांच्या RT-PCR चाचण्या केल्या जातील. JN.1 व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार देखील सतर्क आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, रुग्णालयांतील ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर बेड आणि इतर आवश्यकतांचा आढावा घेतला जात आहे.
कर्नाटक सरकारने 60 वर्षांवरील नागरिकांना, कॉमॉरबिडीटी असलेल्यांना, गरोदर स्त्रियांना आणि स्तनदा मातांना घराबाहेर पडताना फेस मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या आहे. अशा नागरिकांनी कमी हवेच्या जागा आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळावे असंही सांगितलं आहे.
गुजरातमध्ये सध्या कोरोनाचे 13 सक्रिय रुग्ण आहेत. हे सर्व रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. गुजरात सरकारने लोकांना सतर्क राहण्याचा आणि घाबरून न जाण्याचा सल्ला दिला आहे. गुजरात सरकारमधील अधिकाऱ्यांनी, JN.1 सबव्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि आरोग्य विभागाच्या तयारीचं मूल्यांकन करण्यासाठी 5,700 हून अधिक रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल केली.
गोव्यात कोविडचे 19 रुग्ण आहेत. त्यांच्यामध्ये संसर्गाची सौम्य लक्षणं आहेत. ओडिशात गेल्या आठवड्यात कोविडचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये काल (20 डिसेंबरला) कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळले.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) JN.1चं 'व्हेरियंट ऑफ इंट्रेस्ट' असं वर्गीकरण केलं आहे. कारण, त्याचा झपाट्याने प्रसार होत आहे. पण, जागतिक सार्वजनिक आरोग्याला त्यापासून तुलनेनं कमी धोका असल्याचंही संघटनेनं म्हटलं आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) JN.1 व्हेरियंटच्या जीनोम सिक्वेन्सिंगवर रिसर्च करत आहे.
JN.1 व्हेरियंट कसा आहे?
JN.1 (BA.2.86.1.1) व्हेरियंट 2023च्या उत्तरार्धात विकसित झाला असून कोरोना व्हायरसच्या (SARS-CoV-2) 'पिरोला' (BA.2.86) या व्हेरियंटचा वंशज आहे. BA.2.86 प्रथम ऑगस्ट 2023 मध्ये आढळला होता. तो कोविडच्या ओमीक्रॉन XBB, EG.5.1 आणि HK.3 या वंशांपासून फायलोजेनेटिकदृष्ट्या वेगळा आहे. BA.2.86 हा स्पाइक (5) प्रोटिन्समध्ये 30 पेक्षा जास्त उत्परिवर्तन घडवून आणते. यामुळे त्यात व्यक्तीशी रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्याची उच्च क्षमता दिसून येते. JN.1 व्हेरियंट डेन्मार्क आणि इस्रायलमध्ये जुलै 2023च्या अखेरीस सर्वात अगोदर आढळला होता.