सोमवारपर्यंत (18 डिसेंबर) भारतात JN.1ची लागण झालेल्या 1 हजार 828 अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे या नवीन प्रकाराबद्दल चिंता वाढली आहे. केरळमध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
JN.1 हा सब-व्हेरियंट प्रथम युरोपातील लक्झेंबर्गमध्ये आढळला होता. तो ओमिक्रॉनच्या 'पिरोला' (BA.2.86) या व्हेरियंटपासून म्युटेड झाला आहे. यात स्पाइक प्रोटीन आहे. हा उप-प्रकार मूळतः लक्झेंबर्गमध्ये शोधला गेला होता आणि तो ओमिक्रॉन उप-प्रकारचा वंशज आहे, जो पिरोला जातीचा स्रोत आहे (BA.2.86). त्यात स्पाइक प्रोटीन बदलत आहेत त्यामुळे तो अधिक संसर्गजन्य असून लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या वरचढ ठरू शकतो.
advertisement
JN.1ची लक्षणं
या व्हेरियंटची लक्षणे यापूर्वीच्या कोविड व्हेरियंट्ससारखीच आहेत. यामध्ये ताप येणे, सर्दी होणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, कफ होणे आणि गॅस्ट्रोइंटेस्टीनल समस्या या लक्षणांचा समावेश आहे. गुरुग्राममधील सीके बिर्ला हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिन विभागाचे प्रमुख सल्लागार डॉ. तुषार तायल म्हणाले, "त्याच्या संक्रमणक्षमतेमुळे JN.1 हा कोविड विषाणूच्या प्रसाराचा मुख्य स्रोत बनू शकतो. त्याचा प्रसार टाळण्यासाठी सक्रिय प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणं गरेजचं आहे. वारंवार हात सॅनिटाईझ करणे, ट्रिपली मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे, यांसारखे उपाय केले पाहिजेत."
या नवीन प्रकारामुळे गॅस्ट्रोइंटेस्टीनल समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त आहे, असे काही रिपोर्ट समोर आले आहेत. पण, या दाव्यांना बळकटी देण्यासाठी आणखी सखोल संशोधन गरजेचं आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि फेस मास्कच्या वापरासह लोकांनी बूस्टर शॉट्स घ्यावेत असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
JN.1 किती धोकादायक?
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीसी) म्हटलं आहे की, या व्हेरियंटच्या संक्रमणक्षमतेबद्दल चिंता आहे. पण, तो कोविडच्या इतर प्रकारांपेक्षा जास्त प्राणघातक असल्याचे अद्याप कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.
सीडीसीने असेही नमूद केलं की, JN.1 व्हेरियंट आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला मात देण्यास सक्षम असला तरी त्याची लागण झाल्यानंतर स्थिती अधिक गंभीर होण्याची किंवा रुग्णालयात दाखल व्हावं लागण्याची शक्यता खूप कमी आहे.
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज JN.1 बोलताना म्हणाल्या, "सध्या अलार्मची (आणीबाणीची परिस्थिती) गरज नाही. जास्त काळजी करण्याची गरज नाही. तो एक सब-व्हेरियंट आहे. भारतात तो काही दिवसांपूर्वीच आढळला आहे. सिंगापूर विमानतळावर काही महिन्यांपूर्वी तपासण्यात आलेल्या भारतीयांमध्ये हा प्रकार आढळून आला होता. केरळने जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे हा प्रकार ओळखला आहे. नागरिकांनी काळजी करण्याची गरज नाही. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे."
नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष राजीव जयदेवन यांनी सांगितलं की, नवीन स्ट्रेन रोग प्रतिकारशक्तीला मात देऊ शकतो आणि अधिक वेगाने पसरू शकतो. ते म्हणाले, "JN.1 हा एक रोगप्रतिकारक शक्तीचा तीव्र विरोधक आणि वेगाने पसरणारा प्रकार आहे. जो XBB आणि या व्हायरसच्या इतर सर्व व्हेरियंट्सपेक्षा वेगळा आहे. कोविड संसर्गातून बऱ्या झालेल्या लोकांना आणि लसीकरण केलेल्या लोकांना देखील संक्रमित करण्यास हा व्हेरियंट सक्षम आहे."