सोया चाप मुख्यतः सोयाबीनपासून बनवला जातो, मात्र त्यात मैदा (कधी कधी गहू पीठ किंवा बेसन), ग्लूटेन आणि इतर घटक मिसळले जातात. तयार झालेल्या मिश्रणाला लाकडी काड्यांवर गुंडाळून चापचा आकार दिला जातो. त्यामुळे दिसायला आणि खायला तो मांसाहारी पदार्थासारखा वाटतो. सोयाबीनमुळे त्यात प्रोटीन असते हे खरे असले, तरी त्याची गुणवत्ता आणि प्रमाण किती आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे.
advertisement
डाएटिशियन श्वेता पांचाल यांच्या मते, बाजारात मिळणारा बहुतांश सोया चाप हा 'क्लीन प्रोटीन' नसतो. अनेक जण तो उच्च प्रोटीन फूड समजून खातात, पण प्रत्यक्षात तो प्रोसेस्ड फूडच्या श्रेणीत मोडतो. कारण त्यात शुद्ध सोया प्रोटीनपेक्षा मैदा, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, तेल, मीठ आणि फ्लेवरिंग एजंट्सचे प्रमाण जास्त असते.
तज्ज्ञ सांगतात की, अशा प्रकारच्या प्रोसेस्ड सोया चापमध्ये फॅट आणि सोडियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो रोजच्या आहारासाठी योग्य ठरत नाही. नियमित किंवा मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास शरीरात इन्फ्लेमेशन वाढणे, वजन वाढणे तसेच ब्लड शुगर आणि लिपिड प्रोफाइलवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.
म्हणून 'सोया चापमध्ये प्रोटीन असते' हे विधान अर्धसत्य आहे. कारण प्रोटीनसोबतच त्यात मोठ्या प्रमाणात प्रोसेसिंग, मैदा आणि काही वेळा केमिकल अॅडिटिव्ह्जही असतात. हे घटक आरोग्यासाठी दीर्घकाळात हानिकारक ठरू शकतात, विशेषतः जर तो रोज खाल्ला गेला तर.
शरीराला दर्जेदार प्रोटीन पुरवायचे असेल तर डाळी, हरभरा, राजमा, चणे, अंकुरित कडधान्ये, पनीर, टोफू यांसारखे नैसर्गिक आणि कमी प्रोसेस्ड पर्याय अधिक फायदेशीर ठरतात. हे पदार्थ पोषणमूल्यांनी समृद्ध असून शरीरावर दुष्परिणाम करत नाहीत.
थोडक्यात सांगायचे तर, सोया चाप हा चवीसाठी कधीतरी खाण्यास हरकत नाही, पण तो रोजचा किंवा मुख्य प्रोटीनचा स्रोत मानू नये. विशेषतः रेस्टॉरंट किंवा स्ट्रीट फूडमधील सोया चाप हा कधीतरी खावा. संतुलित आहारासाठी नैसर्गिक आणि कमी प्रोसेस्ड प्रोटीन स्रोतांना प्राधान्य देणं हेच आरोग्यासाठी योग्य ठरेल.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
