ज्वारी आणि बाजरीमध्ये भरपूर फायबर, कमी कॅलरीज, आणि आवश्यक पोषक तत्वे असल्याने तिला सुपरफूड म्हणून ओळखले जाते. हिवाळ्यात ज्वारी/बाजरीच्या भाकरीची मागणी ऊसतोड मजुरांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाढते. बाजरीची भाकरी खाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे आहेत? याबद्दच आहार तज्ज्ञ डॉ. अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.
ज्वारी आणि बाजरीमध्ये आयर्न, मॅग्नेशियम, झिंक यांसारखी पोषकद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. यामुळे हाडे मजबूत होतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. बाजरीच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
advertisement
ज्वारी/बाजरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा लो ग्लायसेमिक इंडेक्स, जो रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी बाजरीचा समावेश आहारात केल्याने मोठा फायदा होतो, असं डॉ. अमृता कुलकर्णी सांगतात.
आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे भाकरी पचनास हलकी असते. बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते. बद्धकोष्ठता, पोटफुगी यांसारख्या त्रासांवरही बाजरीचा सकारात्मक परिणाम होतो, असं डॉ. अमृता कुलकर्णी सांगतात. ज्वारी आणि बाजरीच्या या फायद्यांमुळे हिवाळ्यात तिचा समावेश आहारात नक्कीच करायला हवा. ती आरोग्यासाठी लाभदायक असूनही चविष्ट देखील आहे.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.





