मुंबई: सध्याच्या काळात अनेक मराठी तरुण व्यवसायात उतरत आहेत. जिद्द, मेहनत आणि चिकाटीने ते व्यवसायात यशस्वी देखील होत आहेत. मुंबईतील 28 वर्षीय राहुल कदम याची कोरोना काळात नोकरी गेली. उच्च शिक्षित असूनही रोजगाराचं साधन नव्हतं. अशात युट्युबवर पाहून बनवलेला मिल्क शेक मित्रांना आवडला आणि स्वत:चा फूड स्टॉल सुरू करण्याची कल्पना सुचली. आता 3 वर्षानंतर राहुलचा दादर येथे प्रसिद्ध कॅफे असून इथं खवय्यांची नेहमीच गर्दी असते. लोकल18 सोबत बोलताना राहुलने आपला प्रवास सांगितला आहे.
advertisement
कोरोनाच्या काळात अनेकांसारखेच राहुल कदम याची देखील नोकरी गेली. नोकरी सुटल्यानंतर नेमकं काय करायचं? हा विचार मनात होता. मग सुरुवातीलाच घरच्या घरी युट्युबवर बघून वेगवेगळे मिल्क शेक बनवायला सुरुवात केली. काही मिल्क शेक मित्र परिवाराला आवडले. मग विचार केला, नोकरीच नाही तर आपण स्वतःचा एक छोटासा स्टॉल सुरू केला पाहिजे. त्यामुळे कमी भांडवलात स्वतःचा एक फूड स्टॉल सुरू केला. या स्टॉलला कमी काळातच उत्तम प्रतिसाद लाभला, असं राहुल कदम याने सांगितलं.
नोकरी सोडून धरली गावची वाट, गावी येऊन केले खेकडा पालन, वर्षांला आता 6 लाखांचा नफा
40 हून अधिक प्रकार
राहुलने 3 वर्ष अथक मेहनत करून स्टॉलवर वेगवेगळ्या मिल्क शेक, कॉफी सारख्या खाद्यपदार्थांची विक्री केली आणि स्वतःचा खवय्या वर्ग तयार केला. 2023 मध्ये राहुल ने ‘राहुलस् कॅफे’ नावाचा कॅफे सुरू केला. या कॅफेचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी राहुल स्वतःचा स्टॉल लावायचा त्याच्या अगदी समोरच त्याने छोट्याशा जागेत स्वतःचा कॅफे सुरू केला आहे. राहुलकडे कॉफी, मिल्क शेक यासारख्या पदार्थांमध्ये 40 पेक्षा जास्त प्रकार आहेत. शाळेतील मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना परवडेल अशा दरामध्ये राहुल त्याचे सर्व प्रॉडक्ट विकत असतो.
मराठी तरुणांना पाठिंबा द्यावा
“मला माझ्या व्यवसायाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे आहे. तसेच राहुलस् कॅफे हे नाव अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. भविष्यात मी ‘राहुलस् कॅफे’च्या वेगवेगळ्या शाखा देखील सुरू करू इच्छितो. तसेच मराठी माणूस हा उद्योजक बनण्यासाठी सज्ज आहे. तर प्रत्येकाने मराठी तरुणाला आणि उद्योजकाला भरभरून पाठिंबा द्यावा,” असं आवाहन राहुल करतो.