नशेच्या या काळोख्या दुनियेत अशी काही विचित्र गुपिते दडलेली आहेत, जी ऐकून तुम्हाला भीतीही वाटेल आणि किळसही येईल. आज आपण अशाच काही जीवघेण्या आणि अजब नशेच्या प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत, जे सध्या चिंतेचा विषय बनले आहेत.
1. विंचवाचा डंख आणि धूर
अफीमसारख्या अंमली पदार्थांची सवय सोडण्याच्या प्रयत्नात असलेले काही लोक चक्क विंचवाचा आधार घेतात. मेलेल्या विंचवाला उन्हात वाळवून, नंतर कोळशावर जाळून त्याचा धूर श्वासावाटे आत घेतला जातो. विशेषतः विंचवाच्या शेपटीतील विष नशेसाठी वापरले जाते. काहींच्या मते, याची नशा साधारण 10 तास टिकते. सुरुवातीचे काही तास प्रचंड वेदनादायक असतात, पण नंतर मेंदू पूर्णपणे बधीर होतो. यामुळे स्मरणशक्ती कायमची जाण्याची भीती असते. पण तरी देखील लोक ही नशा करतात.
advertisement
2. सरड्याची शेपटी: एक भयंकर व्यसन
भारतातील काही तुरुंगांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक नशेबाज सरड्याची शेपटी कापून ती उन्हात वाळवतात आणि त्यानंतर ती तंबाखूमध्ये मिसळून तिची विडी किंवा सिगारेट ओढतात. सरड्याच्या शेपटीतील विषारी घटकांमुळे गांजापेक्षाही तीव्र नशा होत असल्याचा दावा हे लोक करतात. ही पद्धत अत्यंत विषारी असून यामुळे थेट मज्जासंस्थेवर (Nervous System) हल्ला होतो.
3. कंडोम उकळून त्याची नशा?
काही काळापूर्वी पश्चिम बंगालमध्ये कंडोमची विक्री अचानक वाढल्याने प्रशासन चक्रावून गेले होते. चौकशीअंती जे सत्य बाहेर आले ते थक्क करणारे होते. तरुण मुलं कंडोम गरम पाण्यात उकळून त्याची वाफ घेताना आढळली. कंडोममध्ये असलेले 'अरोमॅटिक कंपाऊंड्स' उकळल्यानंतर वेगळे होतात, ज्याची वाफ घेतल्यावर अंमल चढतो. डॉक्टरांच्या मते, हा प्रकार थेट फुफ्फुसे आणि मेंदू निकामी करू शकतो.
4. सापाच्या विषाचा नशा
हे ऐकायला एखाद्या चित्रपटातल्या कथेसारखे वाटते, पण काही नशेबाज चक्क सापाचा डंख घेतात. यासाठी खास 'रेव्ह पार्टी' आयोजित केल्या जातात. तिथे गारुड्यांच्या मदतीने सापाला जिभेवर, ओठांवर किंवा कानाच्या पाळीवर चावायला लावले जाते. हे विष रक्तात मिसळताच काही सेकंदात तीव्र नशा चढते. ही नशा इतकी जीवघेणी आहे की, सापाच्या विषाचे प्रमाण थोडंही जास्त झालं तर जागीच मृत्यू होऊ शकतो.
५. 'ड्रीमफिश' आणि धतुरा
'सर्पा साल्पा' नावाचा मासा खाल्ल्यानंतर माणसाला विचित्र भास (Hallucinations) होऊ लागतात. हा परिणाम जवळजवळ 36 तास टिकतो. हे एका प्रकारच्या अन्नातून होणाऱ्या विषबाधेसारखे असते, पण नशखोर मुद्दाम याचा शोध घेतात.
धतुरा: धतुरा हा वनस्पतीचा प्रकार अत्यंत विषारी असतो. तरीही अनेक लोक याचे सेवन करतात. यामुळे माणूस शुद्ध हरपतो आणि त्याला भयानक स्वप्न पडत असल्यासारखे भास होतात.
हा आनंद नाही, तर आत्महत्येचा मार्ग आहे
नशेची ही विचित्र रूपं हेच दर्शवतात की, माणूस मानसिकदृष्ट्या किती पोकळ होत चालला आहे. क्षणिक सुखासाठी विंचू, साप किंवा प्लास्टिकचा आधार घेणं ही विकृती आहे. हे केवळ शरीरच नाही, तर माणसाचे सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्यही उद्ध्वस्त करते. या भयंकर वास्तवाबद्दल जागरूकता निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज आहे.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी मद्यपानासाठी प्रोत्साहन देत नाही, अमली पदार्थांचे सेवन हा कायद्याने गुन्हा असून आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
