आपल्या आजूबाजूला अनेकांना मूत्रपिंडांचे विकार झालेले आपण ऐकतो. पण मूत्रपिंडाचा आजार बऱ्याचदा वर्षानुवर्षे शांतपणे वाढत राहतो. थकवा येणं, हातपायांना सूज येणं किंवा लघवीच्या प्रमाणात बदल होणं यासारखी लक्षणं दिसू लागण्यापूर्वीच मूत्रपिंडांचं मोठं नुकसान झालेलं असतं.
मूत्रपिंडं अखेरपर्यंत कार्यक्षम ठेवण्याची जबाबदारी आपली. योग्य दैनंदिन सवयींमुळे मूत्रपिंडं दीर्घकाळ निरोगी ठेवता येतात आणि या आजारांचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो. जाणून घेऊया मूत्रपिंडांचं महत्त्व आणि काळजी.
advertisement
मूत्रपिंड हे शरीराचे फिल्टर आहेत, विषारी पदार्थ काढून टाकणं आणि आवश्यक खनिजं आणि द्रवपदार्थांचं संतुलन राखण्याचं काम ते अविरत करत असतात. म्हणून, मूत्रपिंडांवर अनावश्यक ताण न आणणाऱ्या सवयी अंगीकारणं महत्वाचं आहे.
Bloating : पोटाच्या तक्रारींवर रामबाण उपाय, या बदलांनी सांभाळा पोटाचं आरोग्य
संतुलित आणि निरोगी आहार यात महत्वाची भूमिका बजावतो. आहारात फळं आणि भाज्या, धान्य आणि मध्यम प्रमाणात लीन प्रोटीन समाविष्ट करणं फायदेशीर आहे.
प्रक्रिया केलेलं अन्न, जास्त साखर आणि मीठाचं सेवन कमी केल्यानं उच्च रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते, ज्यामुळे मूत्रपिंडांचं नुकसान टाळता येतं. विशेषतः प्रथिनांचं सेवन प्रमाणात ठेवल्यानं मूत्रपिंडावरील ताण कमी होतो.
हायड्रेशनचं महत्त्व - मूत्रपिंडं निरोगी ठेवण्यासाठी पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. यामुळे कचरा बाहेर पडण्यास मदत होते आणि मूत्रपिंडात होणाऱ्या दगडांचा म्हणजेच किडनी स्टोनचा धोका कमी होतो.
विशेषतः ज्यांना आधीच वैद्यकीय समस्या आहेत त्यांच्यासाठी जास्त पाणी पिणं देखील हानिकारक असू शकतं. शिवाय, अल्कोहोल, साखर असलेली पेयं आणि सॉफ्ट ड्रिंक्स टाळल्यानं मूत्रपिंडांवरील भार कमी होतो आणि वजन व्यवस्थित ठेवण्यासही मदत होते.
नियमित व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारतं, रक्तदाब नियंत्रित होतो आणि मधुमेहाचा धोका कमी होतो, ही सर्व मूत्रपिंडाच्या आजाराची प्रमुख कारणं आहेत.
दररोज अर्धा तास हलका व्यायाम ज्यात वेगानं चालणं, योगा किंवा पोहणं असे व्यायाम खूप फायदेशीर ठरू शकतात. याव्यतिरिक्त, वजन नियंत्रणात ठेवणं महत्वाचं आहे, कारण लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाशी जोडलेला आहे, ज्यामुळे मूत्रपिंडांचं नुकसान जलद होऊ शकतं.
आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय - मूत्रपिंडाच्या आजारापासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नियमित आरोग्य तपासणी करणं. नियमित रक्तदाब तपासणी, लघवी तपासणी आणि मूत्रपिंडाच्या कार्य चाचण्यांमुळे सुरुवातीच्या लक्षणांचा शोध घेण्यास मदत होऊ शकते.
Skin Care : चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी आवश्यक टिप्स, नक्की वापरुन पाहा
ज्यांच्या कुटुंबात मूत्रपिंडाचा आजार, मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा इतिहास आहे त्यांनी विशेषतः सावधगिरी बाळगली पाहिजे आणि नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मूत्रपिंडांचं आरोग्य एकूण आरोग्याशी थेट जोडलेलं आहे.
योग्य आहार, नियमित व्यायाम, तणाव नियंत्रण आणि तंबाखूपासून दूर राहणं यासारख्या सवयींमुळे किडनीच्या आजाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो.
