जमुई : सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी चहा किंवा कॉफी घ्यायची हा अनेकजणांचा दिनक्रम असतो. लाखो लोकांचा दिवस चहाशिवाय सुरूच होत नाही, तर लाखो लोकांना कॉफी प्यायल्यानंतरच ताजंतवानं वाटतं. शिवाय दिवसभरातून चहा-कॉफीची तल्लफ येते ती वेगळीच. परंतु जास्त चहा आणि कॉफी आरोग्यासाठी नुकसानदायी असते, हे आहारतज्ज्ञ वारंवार सांगतात. त्यामुळे आज आपण या दोन लोकप्रिय पेयांना एक लय भारी पर्याय पाहणार आहोत, ज्यामुळे आपलं आरोग्य सुदृढ राहण्यासही मदत मिळेल. शिवाय शरीर दिवसभर छान ऊर्जावान राहील.
advertisement
डॉ. रास बिहारी तिवारी सांगतात की, हर्बल टी पिणं कधीही उत्तम. विशेषतः उन्हाळ्यात ही टी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या टीमुळे अन्नपचन सुरळीत होऊन हळूहळू वजन कमी होतं. या टीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळेच रोगप्रतिकारक शक्ती उत्तम होते.
हेही वाचा : पोट साफ न झाल्यास अख्खा दिवस बिघडतो! यावर उपाय तरी काय?
चहा किंवा कॉफी प्यायल्याने झोप उडते आणि शरीर लगेच ऊर्जावान वाटू लागतं. परंतु यामुळेच अनेकजणांना निद्रानाशाचा सामना करावा लागतो. म्हणूनच डॉक्टर सांगतात की, हर्बल टी घ्यावी. ज्यामुळे निद्रानाशाचा त्रास दूर होण्यास मदत मिळते आणि छान गाढ झोपही लागते. झोप पूर्ण झाल्याने दिवसही ऊर्जावान जातो. या चहामुळे मेटाबॉलिज्म वाढत असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
हर्बल टी बनवण्यासाठी बडीशेप, काळीमिरी आणि लवंगाचा वापर केला जातो. यामध्ये आपण आल्याचा समावेशही करू शकता. ज्यामुळे केवळ आपलं शरीर सुदृढ राहणार नाही, तर शरिरात गारवाही निर्माण होईल.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपल्या आहाराबाबत, आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपण स्वतः डॉक्टरांशी चर्चा करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.