छत्रपती संभाजीनगर : हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसं धार्मिकदृष्ट्या तुळस महत्त्वाची मानलीये, त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये देखील तुळस गुणाकारी मानली गेलीये. तुळस ही आरोग्याचा खजिना मानली जाते. त्यामुळेच रोज सकाळी तुळशीची पानं खाण्याचा सल्ला दिला जातो. याबाबतच छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ रसिका देशमुख यांनी माहिती दिलीये.
तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट आहे. ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात रोगप्रतिकारक घटक आहेत. जे अनेक आजारांवर फायदेशीर ठरतात. खोकल्यासारखे आजार तुळशीच्या पानांनी बरे होतात. त्याचप्रमाणे त्वचेच्या आजारासाठी देखील तुळशीची पाने फायदेशीर ठरतात. दररोज तुळशीचे पाने टाकून चहा घेतल्यास ऍसिडिटी होणार नाही आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते, असं देशमुख सांगतात.
advertisement
सर्दी-खोकला, बद्धकोष्टता अशा समस्यांसोबतच कॅन्सर सारख्या आजारांवर देखील तुळशीची पाने उपयुक्त ठरतात. तुळशीची पाने खाल्ल्याने हाडे मजबूत, हृदय स्वस्थ राहते. तर श्वासाचा दुर्गंध देखील कमी होतो. ताण-तणाव, चिंता यावर देखील तुळस गुणकारी ठरते, असंही देशमुख सांगतात.
रोज सकाळी उपाशोपोटी करावे सेवन
तुळशीची पाने पाण्यामध्ये उकळून ते पाणी सकाळी उपाशीपोटी पिल्यास अत्यंत लाभदायी ठरतं. अनेक आजार जवळच येत नाहीत. तसेच तुळशीच्या पानांमुळे मुखशुद्धी होते. तोंडाशी संबंधित आजार देखील त्यामुळे लांब राहतात. सकाळी उपाशीपोटी खाल्लेली तुळशीची 3-4 पाने देखील आरोग्यासाठी वरदान ठरतात. त्यामुळे रोज सकाळी उपाशीपोटी तुळशीची पाने खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.