हाँगकाँगचे डॉ. अँथनी फौसी अशी ओळख असलेले प्रसिद्ध मायक्रोबायोलॉजिस्ट यूएन क्वोक युंग यांनी जगाची चिंता वाढवणारी भविष्यवाणी केली आहे. जगभरात आणखी एक महामारी पसरणार आहे. ही महामारी कोविड-19पेक्षा जास्त घातक आणि जीवघेणी असेल, असा अंदाज युंग यांनी व्यक्त केला आहे. युंग यांनी यापूर्वी अनेक धोकादायक विषाणूंवर काम केलं आहे. सार्स (सीव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम) या विषाणूवरच्या संशोधनाबाबत त्यांचं 2003मध्ये विशेष योगदान आहे. त्यांनी या विषाणूला वेगळं करून ओळखण्याचं उल्लेखनीय कार्य केलं. आता पुन्हा त्यांनी जगाला इशारा दिला आहे. युंग यांनी सांगितलं, की ही महामारी येणार आणि तिच्यामुळे कोरोनापेक्षा जास्त नुकसान होणार. क्वीन मेरी हॉस्पिटलमध्ये एका चॅनेलशी बोलताना ते म्हणाले, की ते लोक जिथं काम करतात, तिथं महामारी फैलावण्याची शक्यता आहे. जगानं याबाबत सतर्क राहिलं पाहिजे. तुमचा विश्वास बसणार नाही; पण ही महामारी केव्हाही येऊ शकते.
advertisement
यूएन युंग हे कोरोना विषाणू आणि संसर्गजन्य आजार विषयातले तज्ज्ञ मानले जातात. यासाठी त्यांची जगभरात ओळख आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेले युंग कर्तृत्वाच्या जोरावर जगप्रसिद्ध झाले. त्यांचा जन्म 1950 च्या दशकात झाला. त्यांचं लहानपण आई-वडील आणि तीन भावांसह 60 चौरस फुटांच्या घरात गेलं. 1981मध्ये त्यांनी मेडिकल स्कूलमधून पदवी घेतल्यानंतर ते सरकारी डॉक्टर बनले. तिथं त्यांनी अत्यंत कमी पगारावर नोकरी केली. 2003मध्ये सार्स विषाणूवर काम केल्यावर त्यांची ओळख जगाला झाली. हा आजार दक्षिण चीन आणि हाँगकाँगमध्ये जीवघेणा ठरला होता. दोन महिन्यांत सुमारे 300 जणांचा मृत्यू सार्समुळे झाला होता. युंग यांनी कोरोना विषाणूवरसुद्धा मोठं काम केलं आहे.
जगभरात सातत्याने आर्थिक, भूराजकीय आणि हवामानबदल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे युंग यांनी नवीन महामारीबाबत भविष्यवाणी केली आहे. त्यांनी 'माय लाइफ इन मेडिसीन : ए हाँगकाँग जर्नी' या नवीन आत्मचरित्रात जागतिक धोक्याविषयी इशारा दिला आहे. त्यांनी सांगितलं, की 'याला सामोरं जाण्यासाठी आतापासून सर्व देशांच्या सर्वोच्च नेतृत्वाला नियोजन करावं लागेल. सध्या जागतिक नेतृत्वाचे लक्ष आपल्या राष्ट्रीय आणि विभागीय हिताकडे आहे. हवामानबदल आणि संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी त्यांनी काम करणं गरजेचं आहे. कोणत्याही परिस्थितीत याकडे दुर्लक्ष होता कामा नये.'