अमरावती: उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सतत तापमानात वाढ होत असल्याने उकाडा जाणवण्यास सुद्धा सुरूवात झाली आहे. उन्हामुळे बऱ्याचदा त्वचेच्या विविध विकारांचा सामना करावा लागू शकतो. टॅनिंग, सनबर्न, कोरडी त्वचा, काळे ठिपके, एक्जिमा, फोड, पुरळ, बुरशीजन्य संसर्ग अशा प्रकारच्या अनेक समस्या निर्माण होण्याची भीती असते. त्यामुळे आपल्या त्वचेची काळजी आपण आधीच घेतलेली बरी. उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? याबाबत माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
advertisement
त्वचेची काळजी कशी घ्यावी?
त्वचेविषयी कोणतेही उपाय सुरू करण्याच्या आधी आपल्या त्वचेचा नेमका प्रकार कोणता? हे माहीत असणे गरजेचे आहे. उन्हाळा सुरू झाला की टॅनिंग खूप जास्त होते. तेव्हा अनेक लोक सांगतात, हा प्रॉडक्ट वापरून बघा, तो प्रॉडक्ट वापरून बघा. पण, असे काहीही न करता तुमच्या त्वचेचा प्रकार नेमका कोणता? हे सर्वात आधी ओळखून घ्या. त्यानंतर तेलकट त्वचा, कोरडी त्वचा, साधारण असलेली त्वचा या सर्व प्रकारावर वेगवेगळे प्रॉडक्ट वापरावे लागतात, असं डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात.
मॉइश्चरायजर कोणतं वापरावं?
तुमची त्वचा जर तेलकट असेल, तर उन्हाळ्यात तेलकट त्वचा खूप चिपचीपी होते आणि निस्तेज दिसते. त्यामुळे या त्वचेसाठी सेलेसिलिक ऍसिड आणि क्लायक्लोरिक ऍसिड असलेले फेसवॉश तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता. तेलकट त्वचेला उन्हाळ्यात सुद्धा मॉइश्चरायझरची गरज असते. उन्हाळ्यात जर मॉइश्चरायजर वापरले नाही तर तुमची त्वचा जास्त ऑइल सिक्रेट करते आणि निस्तेज दिसायला लागते. त्यासाठी तुम्हाला त्वचेवर ऑइल फ्री मॉइश्चरायझर वापरावे लागतात.
सनस्क्रीन वापरताना घ्या काळजी
उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरण्यासाठी सुद्धा अनेकांकडून आपल्याला सल्ला दिला जातो. पण नेमकं कोणतं सनस्क्रीन वापरावं हे आपल्याला डॉक्टरांकडून सल्ला घेऊनच ठरवावे लागेल. कारण प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी वेगवेगळे सनस्क्रीन मार्केटमध्ये उपलब्ध आहे. सनस्क्रीन वापरताना घ्यावयाची काळजी म्हणजे, सनस्क्रीन हे आपल्या त्वचेवर दोन ते तीन तासच काम करते. त्यामुळे वारंवार तीन तासाने त्वचेवर सनस्क्रीन अप्लाय करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी व्यवस्थित रित्या घेऊ शकता, असे डॉ. टाकरखेडे यांनी सांगितले.





