लहान मुलांना त्यांच्या आवडत्या स्मार्टफोन ॲप्स, व्हिडिओ गेम्स किंवा ई-बुक्सपासून दूर ठेवणे कठीण असू शकते पण ते गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया लहान मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी दिलेले महत्त्वाचे सल्ले.
मुलांना नियमित ब्रेक घेण्यास सांगा : अमेरिकन ॲकॅडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजीचे डॉ. के. डेव्हिड एप्ले सांगतात की, सतत वाचण्यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो. म्हणून दर 20 मिनिटांनी 20 सेकंदाचा ब्रेक घेणे आवश्यक आहे. पालकांनी किचनमध्ये टाइमर लावणे किंवा स्मार्ट डिव्हाइसचा वापर करून मुलांना ब्रेकची आठवण करून द्यावी. त्याचबरोबर ई-बुक्स आणि साध्या पुस्तकांचे वाचन आलटून पालटून करण्यास सांगा. मुलांना प्रत्येक दोन चॅप्टरनंतर किंवा व्हिडिओ गेममधील एक लेव्हल पूर्ण झाल्यावर खिडकीतून बाहेर बघण्यास सांगा. पुस्तक वाचताना प्रत्येक काही चॅप्टरनंतर पेपरक्लिप लावून ठेवा, जेणेकरून मुलाला वर बघण्याची आठवण होईल.
advertisement
स्क्रीन टाईमवर मर्यादा घाला : अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या शिफारशीनुसार, लहान मुले आणि तरुणांसाठी मनोरंजन म्हणून स्क्रीनचा वापर दररोज 1-2 तासांपेक्षा जास्त नसावा. डॉ. ट्रेसी ए. बार्नेट म्हणतात की, अनेक मुले या वेळेपेक्षा खूप जास्त वेळ स्क्रीन वापरतात, त्यामुळे पालकांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
मुलांसमोर चांगले उदाहरण ठेवा : पालकांनी स्वतःच्या स्क्रीनच्या वापराचे योग्य उदाहरण देऊन आणि स्क्रीन टाइमचे नियम घालून मुलांना मदत करावी, असे डॉ. बार्नेट सांगतात. डॉ. एप्ले म्हणतात, "मी मुलांना चष्मासारखे साधन देण्याऐवजी चांगल्या सवयी शिकवण्यावर जास्त भर देतो."
बेडरूमला स्क्रीन-फ्री झोन बनवा : डॉ. बार्नेट यांच्या मते, “बेडरूममध्ये स्क्रीन-आधारित उपकरणे नसावीत, कारण काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की यामुळे झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे, समोरासमोर बोलण्यावर आणि बाहेरच्या वेळेवर जास्त भर द्यावा."
जास्त वेळ बाहेर घालवा : 'ऑप्थॅल्मोलॉजी' मध्ये प्रकाशित झालेल्या एका अलीकडील अभ्यासात डॉ. एप्ले यांना असे आढळले की, बाहेर वेळ घालवल्याने, विशेषतः लहानपणी, नजीकच्या दृष्टीची प्रगती कमी होऊ शकते. जर मुले बाहेर नैसर्गिक प्रकाशात खेळायला जात असतील, तर स्क्रीन घरातच ठेवा. स्क्रीनवरील चमक डोळ्यांवर ताण निर्माण करू शकते.
अंधारात स्क्रीन वापरू नका : यूनिवर्सिटी ऑफ टोलेडोच्या एका अभ्यासानुसार, स्क्रीनमधून बाहेर पडणारा निळा प्रकाश रेटिनातील पेशींना मारतो, ज्यामुळे डोळ्यांचे आजार होऊ शकतात. डॉ. अजित करुणरत्ने यांनी अंधारात स्क्रीन वापरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे, कारण ते अधिक हानिकारक असू शकते. लहान मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी स्क्रीनचा योग्य वापर करणे खूप महत्त्वाचे आहे.