हिवाळ्यात कोणती फळं खायची यासंदर्भात पोषणतज्ज्ञ आणि हेल्थकोच अंशुल जयभारत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी हिवाळ्यात येणारी फळं खाण्याचा सल्ला दिलाय.
रामफळ
हिवाळ्यात रामफळ खाणं हे आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर असल्याचं अंशुल सांगतात. हृदरोग आणि डायबिटीस असलेल्या व्यक्ती रामफळ खाऊ शकतात. रामफळामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. याशिवाय ब्लडप्रेशर नियंत्रित राहून हृदयाला देखील फायदा होता. रामफळात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं जळजळ कमी करण्यास मदत करतात. याशिवाय रामफळामुळे पचन सुधारून पोटाशी संबंधित आजार दूर होतात.
सीताफळ
सीताफळातल्या हेल्दी फॅट्समुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते. त्यामुळे डायबिटीस आणि कोलेस्टेरॉल त्रास असणाऱ्या रूग्णांसाठी सीताफळ खाणं फायद्याचं ठरतं. सीताफळ हे फायबर्सने समृध्द असतात. त्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. सीताफळात कमी कॅलरीज आणि जास्त फायबर्स असतात त्यामुळे पोट भरलेलं राहतं. यामुळे वजन नियंत्रणात राहतं.
हिवाळ्यात पेरू खाणं फायद्याचं ठरतं. पेरूच्या अनेक औषधी गुणधर्मामुळे पेरू हे फळ जरी असलं तरीही ते कोणत्या औषधापेक्षा कमी नाही. पेरूत फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे पचन सुधारून बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसेस सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.पेरूत अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशिअम चांगल्या प्रमाणात असतात.
पपई
पपई ही उष्ण प्रकारातली असल्याने हिवाळ्यात पपई खाण्याचे अनेक फायदे होऊ शकतात. पपईतही फायबर्स, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्सने असतात. त्यातलं पॅपेन हे एंझाइम आतड्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. त्यामुळे पचन सुलभ होतं. गर्भवती महिलांनी पपईचं सेवन टाळावं.
केळी
असं म्हणतात चालणं हा सर्वांगसुंदर व्यायाम आहे. त्याच पद्धतीने केळं हे सर्वांगसुंदर असं फळ ठरू शकतं. केळी वर्षभर उपलब्ध असतात ती पचनासाठी फायदेशीर आहेत. केळ्यातल्या फायबर्समुळे अन्न पचायला मदत होते तर व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून हिवाळ्यात साथीच्या आजारांपासून बचाव होऊ शकतो. ज्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास आहे अशांनी केळी खाणं टाळावं.
