कोल्हापूर: महाराष्ट्रातील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि खाद्य वैभवाने समृद्ध असे शहर म्हणजे कोल्हापूर. कोल्हापुरी मटणाची तिखट चव आणि खास मासाल्यांमुळ कोल्हापूरची खाद्यसंस्कृती जागतिक स्तरावर नेहमीच चर्चेत असते. इथल्या लोकांचं खाद्यप्रेम देखील नेहमीच चर्चेत असतं. आता कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी पेठेत मटण विक्रीसाठी चक्क मांडव उभारण्यात आलाय आणि पहाटेपासूनच इथं लोकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. या अभूतपूर्व गर्दीमागे गेल्या 18 वर्षांपासून अखंडपणे चालत आलेली शिवाजी पेठेच्या ‘माही’ची परंपरा हे कारण आहे. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या बुधवारी आयोजित होणारी ही माही स्वस्त दरात दर्जेदार मटण उपलब्ध करून देते, यंदा मटणाचा दर फक्त 560 रुपये प्रति किलो इतका ठेवण्यात आलाय. या अनोख्या उपक्रमाने कोल्हापूरच्या मटणप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
माहीची परंपरा: सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व
पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ‘माही’ ही संकल्पना आजही जिवंत आहे. यासाठी बाहेर गावाहून पाहुणे मंडळी येत असतात. अगदी तशीच परंपरा कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी पेठेने गेल्या 18 वर्षांपासून जपली आहे. दरवर्षी हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या बुधवारी शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात माहीच्या निमित्ताने मटन विक्री केली जाते. एरवी मटणाचा दर हा 700 रुपयाहून अधिक असतो. मात्र या छत्रपती शिवाजी पेठेच्या माहीच्या निमित्ताने यंदा, मटणाचा दर 560 रुपये प्रति किलो इतका ठेवण्यात आलेला आहे, जो इतर बाजारपेठांच्या तुलनेत खूपच कमी आहे. यामुळे मटणप्रेमींसाठी हा दिवस उत्सवाप्रमाणेच असतो.
मांडवाची व्यवस्था: स्वच्छता आणि नियोजन
शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात माहीच्या निमित्ताने मटण विक्रीसाठी खास मांडव उभारण्यात आलाय. या मांडवात स्वच्छता, व्यवस्थित नियोजन आणि ग्राहकांच्या सोयीला प्राधान्य देण्यात येतं. मटण प्रक्रियेसाठी स्वच्छतेचे काटेकोर नियम पाळण्यात येतात आणि ग्राहकांना रांगेत व्यवस्थित थांबण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक लोकांकडून या उपक्रमासाठी स्वच्छतेसाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. माहीच्या या नियोजनामुळे ग्राहकांचा अनुभव सुखकर झाला, आणि मटण खरेदीला उत्सवाचे स्वरूप मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
रांगाच रांगा: मटणप्रेमींचा अभूतपूर्व उत्साह
माहीच्या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून उभा मारुती चौकात मटण खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली. गृहिणी, हॉटेल व्यावसायिक आणि खवय्ये यांनी मटण खरेदी करण्यासाठी रांगा लावल्या. कोल्हापुरी मटणाची तिखट चव, खास मसाले आणि पारंपरिक रस्सा यामुळे या माहीची क्रेझ कायम आहे. माहीच्या दिवशी मटण स्वस्त आणि ताजे मिळते. कोल्हापुरी मटणाची चव तर अप्रतिम आहे. रांगेत थोडा वेळ थांबावे लागले तरी हा अनुभव अविस्मरणीय असतो, असं स्थानिक रहिवाशांच म्हणणं आहे.
कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीचा वारसा
कोल्हापुरी मटण, त्यातील तिखट मसाले, खास चव आणि तयारीची पद्धत यामुळे देशभरात लोकप्रिय आहे. माहीच्या निमित्ताने ही खाद्यसंस्कृती आणखी समृद्ध झाली. मटणासोबत तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी मसाले आणि स्थानिक पदार्थ यांचा आस्वाद घेण्यासाठी लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला. माहीचा हा उपक्रम कोल्हापूरच्या खाद्य आणि सांस्कृतिक वारशाचा उत्कृष्ट नमुना आहे. कोल्हापूरच्या खाद्यप्रेमींसाठी माही हा केवळ मटण खरेदीचा प्रसंग नसून, एक सांस्कृतिक उत्सव आहे, असे एका स्थानिकाने सांगितले.