महाशिवरात्री हा वर्षांतला सर्वांत महत्त्वाचा सण मानला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी श्री शंकराची मनोभावे पूजा केल्यास भगवान शंकराची कृपादृष्टी लाभते असं मानलं जातं. या दिवशी महिला आणि पुरुष आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी उपवास करतात. मनासारखा पती मिळावा यासाठी अविवाहित तरुणी या दिवशी विशेष व्रत करतात. महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि पार्वती मातेचा विवाह झाला होता, असा उल्लेख पौराणिक कथांमध्ये आहे. त्यामुळे वर्षभर दर महिन्याला येणाऱ्या शिवरात्रीला विशेष व्रत केलं जातं आणि वर्षातून एकदा महाशिवरात्री साजरी केली जाते.
advertisement
Holi 2024 : धुलिवंदन आणि होळी नक्की कधी आहे? वाचा तारीख ते शुभ मुहूर्त
महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करून पांढरं वस्त्र परिधान करावं. या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणं अशुभ मानलं जातं; मात्र याशिवाय तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता; मात्र काळ्या रंगाचे कपडे कदापि परिधान करू नयेत. पूजेत बेलाची पानं, भांग, धोत्र्याची फुलं, जायफळ, फळं, गोड पान आणि नैवेद्यासाठी पांढऱ्या रंगाचे पदार्थ महत्त्वाचे असतात.
फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी होते. यंदा 8 मार्च 2024 रोजी रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी चतुर्दशी सुरू होत आहे. 9 मार्चला 6 वाजून 17 मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल. त्यामुळे 8 मार्चला शुक्रवारी महाशिवरात्री साजरी होईल. महाशिवरात्रीचा शुभमुहूर्त चार प्रहरांमध्ये आहे. यात रात्रीच्या पहिल्या प्रहरासाठी पूजेचा मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून 25 मिनिटांपासून ते रात्री 9 वाजून 28 मिनिटांपर्यंत असेल. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी मुहूर्त 9 वाजून 28 मिनिटांपासून ते 9 मार्च रोजी रात्री 12 वाजून 31 मिनिटांपर्यंत असेल. तिसऱ्या प्रहराचा मुहूर्त रात्री 12 वाजून 31 मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून 34 मिनिटांपर्यंत असेल. महाशिवरात्रीच्या चौथ्या प्रहराचा पूजा मुहूर्त पहाटे 3:34 ते 06:37 पर्यंत असेल.
