काळ बदलतो तशी जीवनशैली देखील हळहळू बदलत जाते. या बदलांनुसार आपलं घरही एक नवा लूक मागत असते. पण त्यासाठी घराची पूर्णपणे दुरुस्ती करणे आवश्यक नसते, तुम्ही काही छोटे छोटे बदल करून देखील घराला नवा आणि आकर्षक लूक देऊ शकता. घरात केलेले छोटे बदल तुमच्या घरातच नाही, तर तुमच्या मनस्थितीत आणि रोजच्या अनुभवातही सकारात्मक फरक घडवून आणत असतात.
advertisement
दुर्लक्षित जागांना द्या महत्त्व..
व्हॉक्स इंडियाचे संस्थापक वरुण पोद्दार यांच्या मते "घर आकर्षक बनवण्यासाठी पूर्ण नूतनीकरणाची गरज नसते. काही विचारपूर्वक केलेले बदलही घराचा लूक पूर्णपणे बदलू शकतात. त्यांनी छताकडे खास लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
छताची सजावट : छत हे घराच्या सर्वात दुर्लक्षित भागांपैकी एक असते. फॉल्स सीलिंग किंवा बाल्कनीतील आकर्षक सीलिंग डिझाइनमुळे कोणतेही मोठे बांधकाम न करता तुमच्या खोलीला एक वेगळी ओळख मिळू शकते.
वॉल पॅनल्सचा वापर : भिंतीवरील डेकोरेटिव्ह पॅनेल घराला एक वेगळाच लूक देतात. लाकूड, दगड किंवा आधुनिक मटेरियलपासून बनवलेले हे पॅनेल लिव्हिंग रूम किंवा बेडरूममध्ये भिंतीची शोभा वाढवतात. यामुळे बाहेरच्या भिंती देखील अधिक आकर्षक दिसू शकतात.
फरशीचा विचार करा : घराच्या लूकमध्ये फक्त गालिचेच नाही, तर घरात वापरल्या जाणाऱ्या फरशीचाही परिणाम मोठा असतो. एसपीसी आणि लाकडी फरशी टिकाऊ असतात आणि त्यामुळे घरात एक आधुनिक आणि आकर्षक लूक मिळतो. या फरशांची काळजी घेणे सोपे असते आणि त्यामुळे घराचे डिझाइन देखील लगेच सुधारते.
लहान गोष्टींचा मोठा परिणाम..
जागांचा योग्य वापर : वेदास एक्सपोर्ट्सचे संस्थापक पलाश अग्रवाल हे रिकाम्या कोपऱ्यांवर लक्ष देण्याचा सल्ला देतात. एका साध्या शेल्फवर ठेवलेली एक कलाकृती त्या जागेची ऊर्जा पूर्णपणे बदलू शकते. जेवणाच्या टेबलावर ठेवलेले एक शोभेचे फुलदाणी साध्या जेवणालाही खास बनवू शकते, असे ते म्हणतात.
भारतीय शैलीतील सजावट : भारतातील विविध ऋतू आणि सण-उत्सव आपल्याला घराच्या सजावटीसाठी भरपूर प्रेरणा देतात. उदाहरणार्थ, पावसाळ्यामध्ये तुम्ही फुलांऐवजी हिरवीगार रोपे वापरू शकता. यामुळे पावसाळ्याची शांतता आणि निसर्गाशी जवळीक साधता येते.
लेअरिंगची कला : भारतीय घरांमध्ये अनेक वर्षांपासून 'लेअरिंग'ची कला वापरली जाते. याचा अर्थ घरातील सर्व जागा भरून काढणे नसतो, तर काही विशिष्ट गोष्टींची निवड करून घरातील इंटेरिअरला पूर्णत्व देणे असते. उदाहरणार्थ जुन्या कलाकृतीसोबत आधुनिक फुलदाणी ठेवणे किंवा पुस्तकांसोबत काही खास वस्तू मांडून शेल्फला एक गॅलरीचे रूप देणे.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.