कॉफीतले महत्त्वाचे घटक
कॉफीमध्ये कॅफेन व्यतिरिक्त अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 3, मॅग्नेशियम, पोटॅशियम, विविध फिनोलिक संयुगं आढळून येतात. अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराचं मुक्त रॅडिकल्सपासून रक्षण होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते.
advertisement
जाणून घेऊयात दररोज कॉफी पिण्याचे फायदे
हृदयाचं आरोग्य सुधारतं
कॅफीनमुळे रक्तदाब नियंत्रित राहायला मदत होते. ज्यामुळे हार्ट ॲटकचा धोका कमी होऊन हृदयाचं आरोग्य सुधारतं. एका अभ्यासात, संशोधकांना असं आढळून आलं की, कॉफी न पिणाऱ्यांच्या तुलनेत दररोज 3 ते 5 कप कॉफी पिणाऱ्या व्यक्तींचा हृदयविकाराचा धोका 15 टक्क्यांपर्यंत कमी होतो.
डायबिटीसवर गुणकारी
कॉफीच्या सेवनाने टाईप 2 डायबिटीसचा धोका कमी होऊ शकतो. काही वर्षापूर्वी 48,000 हून अधिक लोकांवर संशोधन करण्यात आलं होतं, त्या संशोधनात असं आढळून आलं होतं की, गेल्या चार वर्षांत ज्यांनी दररोज किमान एक कप कॉफी प्यायली आहे त्यांना इतरांच्या तुलनेत टाईप 2 डायबिटीसचा धोका 11 टक्कांनी कमी आढळून आला होता. कॉफी प्यायल्याने डायबिटीसला अटकाव जरी घालता येत असला तरीही ज्यांना डायबिटीस झाला असेल त्यांच्या रक्तातली साखर कॉफीमुळे कमी झाली याचं संदर्भात काही विशेष माहिती आढळून आलेली नाही. त्यामुळे डायबिटीस होऊ नये या करता कॉफी गुणकारी ठरू शकते. मात्र डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कॉफीचं सेवन करावं.
चरबी जाळण्यास मदत
कॉफी प्यायल्याने भूक लागत नसल्याचा दावा अनेकजण करतात. याशिवाय कॉफीत असलेल्या कॅफीनमुळे चयापचय दर हा 3 ते11 टक्क्यांनी वाढू शकतो. म्हणूनच कॉफीला फॅट बर्निंग ड्रिंक असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे ज्या लठ्ठ किंवा जाड्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांना डाएट करायचं आहे अशा व्यक्तींसाठी कॉफी पिणं फायद्याचं ठरतं.
लिव्हर कॅन्सरचा धोका कमी होतो
कॉफीचं नियमित सेवन हे लिव्हर म्हणजेच यकृताच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. कॉफीच्या सेवनाने हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा या यकृताच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं होतं की, ज्या व्यक्ती दररोज दोन ते तीन कप कॉफी पितात त्यांना दीर्घकालीन यकृत रोग होण्याचा धोकाही कमी होतो.
दिवसात किती कॉफी प्यावी ?
तुम्हालाही कॉफी पिण्याची आवड असेल तर तुम्ही ब्लॅक कॉफी किंवा साखर न घातलेली कॉफी दिवसातून 4 ते 5 वेळा जरी प्यायलात तरीही तुम्हाला नुकसान होणार नाही.मात्र कॉफीत असलेल्या ॲसिडिक गुणधर्मांमुळे ज्यांना ॲसिडिटी किंवा जळजळीचा त्रास आहे अशा व्यक्तींनी जास्त कॉफी पिणं टाळावं.
कॉफी पिण्याची योग्य वेळ
प्रत्येकाच्या कामानुसार आणि गरजेनुसार कॉफी पिण्याची वेळ बदलू शकते. उदा. ज्यांना रात्री उशीरापर्यंत काम करायचं आहे. ते रात्री कॉफी पिऊ शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की कॉफीमुळे भूक कमी लागते आणि काही तासांसाठी झोप दूर पळते. त्यामुळे रात्री केव्हा कॉफी प्यावी हे प्रत्येकाने ठरवावं. मात्र सकाळी उठल्यावर दुपारी जेवणापूर्वी आणि संध्याकाळी तुम्ही कॉफीचा आनंद नक्की घेऊ शकता.