छत्रपती संभाजीनगर : प्रेम करताना कोणती व्यक्ती जात, धर्म बघून प्रेम करत नाही. प्रेम करताना फक्त समोरच्या व्यक्तीचे मन बघून आणि निस्वार्थ भावनेने एकमेकांनावर प्रेम करतात. छत्रपती संभाजीनगरमधील मंगल खिवसरा आणि शांताराम पंदेरे यांनी जात धर्म न बघता एकमेकांवर नि:स्वार्थी प्रेम केल्याने आज दोघांचाही सुखाचा संसार सुरु आहे. त्यांची प्रेम कहाणी चळवळीमध्ये सुरु झाली होती.
advertisement
मंगल या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीम या गावच्या आहेत. मंगल यांच्या घरात एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे त्यांना बहिण आणि भाऊ मिळून ते 10 भावंडे आहेत. मंगल यांचे वडील अडत व्यापारी होते. त्यांनी पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेतून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी कर्जत येथे प्री डिग्री आर्ट पर्यंतचे शिक्षण सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संशोधन पूर्ण केलं.
चळवळीतच सुरू झाली लव्हस्टोरी
1972 मध्ये गावामध्ये युवक क्रांती दलाची चळवळ सुरू होते. या चळवळीमध्ये शांताराम आणि मंगल यांची पहिली भेट झाली. पुढे भेटीगाठी वाढत गेल्या. मंगल यांना शांताराम आवडू लागले. त्यानंतर मला तुला बोलायचं आहे असा निरोप मंगल यांनीच शांताराम यांना पाठवला आणि ठरलेल्या ठिकाणी त्यांची भेट झाली. ते त्यांच्या एका मैत्रिणीच्या घरी भेटले होते. तिथे गेल्यानंतर मंगल यांनी शांताराम यांना लग्नाचा प्रस्ताव दिला आणि आत्ताच हो किंवा नाही असं सांगायला सांगितलं.
मंगल यांचा हा प्रस्ताव ऐकून शांताराम एकदम विचारात पडले त्यांना काय बोलावं काही सूचेना. मंगल यांनी शांताराम यांना हो म्हूणन सांग असे सांगितले. त्यांनी थोडा विचार केला आणि नंतर लग्नासाठी होकार दिला, असं शांताराम सांगतात. त्यानंतर काय काही काळ ते दोघे असेच एकमेकांना भेटत होते. जेव्हा लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हा मंगल यांनी 1 एप्रिल 1978 रोजी घर सोडले आणि बीड या ठिकाणी जाऊन दोघांनी लग्न केलं.
लग्न झालं पण गावात 144 कलम
मंगल सांगतात की, आपल्याकडे 1 एप्रिल म्हणाल तर एप्रिल फुल म्हणून साजरा करतो. तसेच मी माझ्या घरच्यांना एप्रिल फुल बनवून लग्न केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले यांनी आमचं लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतर आम्ही काही काळ बीडमध्येच राहिलो. याचं दरम्यान मी पळून गेले म्हणून गावामध्ये भांडण सुरू झालं. युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांना गावकऱ्यांनी मारलं त्यांना त्रास दिला. गावात तणाव निर्माण झाला आणि यासाठीच गावमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कलम 144 लागू झालं. त्यानंतर मी गावकऱ्यांना एक पत्र पाठवलं. त्या पत्रात मी असं लिहिलं होतं की मी माझ्या स्वेच्छेने लग्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणीही याचा बाऊ करू नये, असं त्या सांगतात.
काही काळ बीडमध्ये राहिल्यानंतर मंगल आणि शांताराम छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक झाले. इथे आल्यानंतर मंगल यांनी त्यांचं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी नोकरी देखील केली. शांताराम यांचं चळवळीचं काम चालू होतं. सध्या या दाम्पत्याला एक मुलगी असून ती अमेरिकेत आहे. आज मंगल आणि शांताराम यांचा संसार सुखाचा सुरू आहे.