नाशिक: झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेक ऑनलाईन एपला बळी पडत आहे. बीडमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने ड्रीम ११ आणि रम्मी सर्कलच्या नादापायी चोरी केल्याची घटना उघड झाली. अशातच नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यामुळे सोळा वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सम्राट भालेराव असं आत्महत्या केलेल्या सोळा वर्षीय युवकाचे नाव आहे. सम्राट हा नाशिक रोड परिसरातील डायना नगर येथील जय भवानी रोड इथं राहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्याला मोबाईलवर गेम खेळण्याचा नाद लागला असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं. तो मोबाईलमध्ये अनेक वेळा गुंतून असायचा. रात्रंदिवस तो ऑनलाईन गेम खेळायचा. यामध्ये अनेक असे एप होते, त्यामध्ये पैसे लावत होता.
advertisement
मंगळवारी रात्रीच्या सुमारास नेहमीप्रमाणे सम्राट आपल्या रूममध्ये गेला. पैसे लावून तो मोबाईलमध्ये गेम खेळत होता. पण गेम खेळत असताना तो पैसे हरला. पैसे हरल्यामुळे तो नैराश्यात गेला. यातून त्याने राहत्या घरात त्याने गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी बराच वेळ झाला तरी सम्राट बाहेर न आल्यामुळे कुटुंबीयांना संशय आला, त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला असता सम्राटचा मृतदेह आढळला.
या घटनेने परिसर हळहळला आहे. सम्राटच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे. घरात एकमेव पुरुष असलेल्या सम्राटवर पुढे मोठी जबाबदारी होती, मात्र त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.. मुख्य म्हणजे, या घटनेनंतर तरी पोलीस यंत्रणेचे डोळे उघडून अशा जुगार खेळवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल का? असा संतप्त सवाल नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे.