सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये 22 आमदारांच्या मुद्यावरून राजकीय खणाखणी सुरू झालीय. आदित्य ठाकरेंनी केलेल्या दाव्यामुळे 20 जून 2022 रोजी राज्यात घडलेल्या राजकीय भूकंपाची आठवण ताजी झाली. 20 जून 2022 रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदार आणि मंत्र्यांसोबत सुरतच्या दिशेनं रवाना झाले होते.
advertisement
दुपारपासून नॉट रिचेबल असणारे एकनाथ शिंदे विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुरतला पोहोचले होते. परिणामी मविआच्या सरकारचा निकाल लागला होता. तशीच राजकीय परिस्थिती आता निर्माण झाल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं. आदित्य ठाकरेंनी त्या 22 आमदारांचा एक व्हाईस कॅप्टन असून त्याचा उद्योग असल्याचा, सूचक अंगुलीनिर्देशही केला. तर आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. शिवसेना मजबूत व्हावी यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट फुसका
शिवसेनेनं आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट फुसका असल्याचा दावा केला आहे. आदित्य ठाकरेंनी केलेल वक्तव्य खरं ठरतं की खोटं, हे भविष्यात स्पष्ट होईल. ते वक्तव्य जर खरं झालं तर 2022 मधील राजकीय भूकंपाच्या इतिहासाची ती पुनरावृत्ती असेल, हे निश्चित आहे.
