नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोकाट जनावरांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एक वृद्ध व्यक्तीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसाार, नाशिक शहरातील कळवण इथं ही 23 जून 2025 रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. भालचंद्र रघुनाथ मालपुरे (वय 79) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
advertisement
भालचंद्र मालपुरे हे रस्त्यावरून जात होते. नेमकं त्याचवेळी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन मोकाट जनावरांनी मालपूरे यांच्यावर हल्ला केला. त्यांना धडक देऊन खाली पाडलं आणि लाथांनी तुटवलं. हे पाहून तिथे उपस्थितीत असलेल्या लोकांनी मोकाट जनावरांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण या दोन्ही बैलांनी जमाववर हल्ला केला.
लोकांनी लाठ्या-काठ्या घेऊन या दोन्ही मोकाट बैलांना हुसकावण्याचा प्रयत्न केला पण तरीही ते कुणाला ऐकायला तयार नव्हते. त्यांनी पुन्हा एकदा लोकांवर हल्ला केला. यावेळी समोरून आलेले मानपूरे यांना जबर मार लागला आणि ते जागेवर कोसळले. लोकांनी आरडाओरडा करून दोन्ही बैलांना तिथून हुसकावून लावण्यात अखेर यश मिळवलं. या दोन्ही बैलांच्या हल्ल्यात आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. गंभीर जखमी व्यक्तीला तातडीने नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
स्थानिक प्रशासन, पोलीस आणि पशुसंवर्धन विभागाकडून याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.