अहिल्यानगर : बनावट नोटा सिगारेट विक्रेत्यांना देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नगर तालुक्यातील आंबीलवाडीमध्ये करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 88 लाख 20 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तसंच 8 आरोपींपैकी 7 जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. एक व्यक्ती वारंवार सिगारेटची पाकिटं घेऊन जात असल्यामुळे पोलिसांना याबाबतचा संशय वाढला, यानंतर पोलिसांनी ट्रॅप रचला, तेव्हा या व्यक्तीच्या गाडीमध्ये बनावट नोटा सापडल्या.
advertisement
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. कर्जत तालुक्यातील कुंभम्हाळी निखील गांगर्डे आणि नगरमधील सोमनाथ शिंदे हे दोघे महिंद्रा थार गाडीतून पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेऊन फिरताना सापडले, त्यांच्याकडे चौकशी केली असता बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही या रॅकेटचे जाळे असल्याचं स्पष्ट झालं.
पोलिसांनी यानंतर प्रदीप कापरे, मंगेश शिरसाठ, विनोद अरबट, आकाश बनसोडे, अनिल पवार यांना अटक केली आहे. तर अंबादास ससाणे हा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी 59.5 लाखांच्या बनावट नोटा, 2 कोटी 16 लाखांचा कागद, शाईसाठा, 27.90 लाखांचे मशीन आणि संगणक साहित्य असा एकूण 88,20,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फरार आरोपी अंबादास ससाणेचा शोध सुरू असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.