पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला पोलिसांनी शस्त्र परवाना देण्यासाठी नकार दिला होता. पण गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी पोलिसांचा अहवाल डावलून सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिला होता. या मुद्यावरून राजकारण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाने कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी खडकवासला भागाचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्यावर भाष्य करता सचिन घायवळ प्रकरणावर भाष्य केले. अजित पवार यांनी म्हटले की, निलेश घायवळ प्रकरणात पोलीस आयुक्तांसोबत बोलणं केले असून या प्रकरणातील कोणीही दोषी असू द्या, त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, घायवळला शस्त्र परवान्यासाठी काहींना शिफारस केली होती. पण, सचिन घायवळला पोलिसांनी शस्त्र परवाना दिला नसल्याचेही पोलिसांनी आयुक्तांनी सांगितले असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
advertisement
पासपोर्ट प्रकरणी चौकशी सुरू...
निलेश घायवळ याला पासपोर्टसाठी कोणाची शिफारस त्याचीदेखील चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून कारवाई होणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. घायवळ प्रकरणात कुणाचाही राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही, दोषी कोणत्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी असला तरी त्याच्या कारवाई केली जाणार असल्याचे अजित पवारांनी म्हटले.
तरच, मंत्री दोषी आहे असे म्हणू शकतो...
गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत अजित पवारांनी म्हटले की, शिफरस केल्यानंतरही पोलिसांकडून चौकशी केली जाते. सगळ्या प्रकरणाची शहानिशा करणे, परवाना देणे याबाबत सगळी माहिती घेणे पोलिसांचे, संबंधित विभागाचे काम असते. शिफारस केल्यानंतरही संबंधित पोलिसांकडून, संबंधित खात्याकडून वस्तुस्थिती सांगितली जाते. मात्र, तरीही प्रतिकुल मत असूनही मंत्र्यांच्या आग्रहाने त्यावर कार्यवाही झाल्यास तो मंत्री दोषी आहे, असेही अजित पवारांनी सांगितले. या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी सुरू असल्याचे पवारांनी म्हटले.