विमान अपघाताच्या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. या तपासाबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांदरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास आता एका विशेष यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे.
DGCA कडून अद्याप समन्स नाही
गेल्या काही तासांपासून विमान कंपनी किंवा संबंधितांना DGCA कडून समन्स बजावण्यात आल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, DGCA ने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, त्यांनी अद्याप कोणालाही समन्स धाडलेले नाहीत. प्रक्रियेनुसार प्राथमिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
advertisement
तपासाची सूत्रे आता 'AAIB' च्या हाती
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, अधिकृत तपासाची सर्व सूत्रे आता AAIB (एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) कडे सोपवण्यात आली आहेत. ही संस्था विशेषतः विमान अपघातांच्या तांत्रिक आणि सखोल तपासासाठी ओळखली जाते. आता यापुढील सर्व चौकशी, पुराव्यांचे संकलन आणि अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार AAIB कडे असतील.
सखोल चौकशीला सुरुवात
AAIB कडून या प्रकरणातील तपास प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता, विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' आणि तांत्रिक माहितीची तपासणी केली जाईल. अपघातावेळी असलेली विजिबिलिटी (दृश्यमानता) आणि हवामानाचा अहवाल तपासला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याशिवाय, वैमानिक आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) यांच्यातील संवादाचे विश्लेषण केले जाणार आहे.
अपघाताचे नेमके कारण काय होते? तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता AAIB च्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.
