महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृह या तिन्ही उपक्रमांच्या उद्घाटन आणि प्रारंभोत्सवाच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले. या कार्यक्रमाला दिवंगत नेते एनडी पाटील यांच्या पत्नी माई पाटील, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रोहित पवार आदी नेते उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी करून रोहित पवार, चंद्रकांत पाटील, जयंत पाटील यांना कोपरखळ्या मारल्या. अजित पवार यांनी सूत्रसंचालकांना देखील सोडले नाही.
advertisement
मी काय देखणा नाही काय? तू माझ्याकडे ये, बघतो तुला....
कार्यक्रमाच्या सूत्र संचालकांनी भाषणाला नाव घेण्याआधी जयंत पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनोख्या अंदाजात प्रशंसा केली. आवाजात प्रेमळपणा असलेले देखणे नेतृत्व म्हणजे जयंतराव पाटील असा उल्लेख सूत्र संचालकांनी केला. अजित पवार यांनी बरोबर हीच गोष्ट लक्षात ठेवून त्यांच्या भाषणात या गोष्टीचा उल्लेख केला. जयंतराव देखणे आहेत, मग आम्ही काय देखणे नाहीत काय? इस्लामपूर वाळव्यावा आम्हाला बोलवायचं आणि आमची बिन पाण्याने करायची, हीच का तुमची पद्धत? तू माझ्याकडे ये, बघतो तुला.... अशा मिश्किल अंदाजात अजित पवार यांनी सूत्र संचालकांची शाळा घेतली.
अजित पवारांनी चंद्रकांत पाटील-रोहित पवारांना देखील सोडलं नाही
आम्ही सोन्याचे चमचे तोंडात घेऊन जन्माला आलो नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले. चंद्रकांत दादांच्या याच वक्तव्याची नोंद अजित पवार यांनी आपल्या भाषणात घेतली. आम्ही पण मुंबईत दोन खोल्यांच्या घरात दिवस काढले. त्यामुळे आम्हीही सोन्याचे चमचे तोंडात घेऊन जन्माला आलो नाही, असे म्हणत जागच्या जागी अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिले. तसेच गावकीकडे जास्त लक्ष देणारे अजितदादा भावकीकडे कमी लक्ष देतात, असे म्हणणाऱ्या रोहित पवार यांनाही अजित पवार यांनी मिश्किल अंदाजात सुनावले. महोदय तुम्ही बॅलेट पेपरवच्या मतदानात निवडून आला आहात. तुमच्याकडे जर लक्ष दिले नसते तर तुम्ही कसे निवडून आला असतात...? असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला. अजित पवार यांच्या या विधानावर सभागृहात हास्यकल्लोळ झाला.