गोल्डनमॅन म्हणून मिरवणाऱ्या हौशी कार्यकर्त्यांना 'आता हे अति होतंय' म्हणत अजित पवार यांनी टोले लगावले. चाकण येथील रांका ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुरुषांच्या सोने परिधान करणाऱ्या वाढत्या हौशीवर मिश्किल टिप्पणी केली. यावेळी मंचावर उपस्थित माजी आमदार दिलीप मोहिते पाटील हे पोटधरून हसले.
अवतीभवती गोल्डनमॅनचा वावर, अजित पवारांनी बरोबर लक्षात ठेवून कार्यक्रम केला
advertisement
अजित पवार म्हणाले, लोकांचे राहणीमान बदलतंय, क्रयशक्ती वाढते आहे. साहजिक लोकांना अंगावर सोनं घालावंस वाटतंय. लोक सोन्याच्या दुकानात जाऊन चांगल्या प्रतिचे सोने विकत घेत आहेत. सोने हे गुंतवणुकीसाठी चांगले आहे. उद्या कुटुंबावर एखादी वेळ आली तर सोने मोडून निकड भागवता येते किंवा बँकेत गहाण ठेवते येते. आपल्याकडे गोल्डन मॅन म्हणून काही जणांची ओळख आहे. काहींनी सोन्याचे कपडेच शिवले आहेत पण हे अति होतंय.
पुरुष मंडळींना माझे सांगणे आहे की आपल्या आईच्या, बहिणीच्या किंवा पत्नीच्या अंगावर सोने शोभून दिसते. पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही. त्याच्यामुळे त्या भानगडीत पडू नका. उगीचच बैलाला साखळी घालतात तसे लोक अंगावर सोने घालतात आणि माझ्या समोर येतात. खरे तर त्यांच्या पैशांनी त्यांनी सोने खरेदी केलेले असते. मला त्याबद्दल बोलण्याची काही अधिकार नाही पण घरातल्या स्त्रियांच्या अंगावर त्यांनी ते सोने घालायला दिले तर ते अधिक शोभून दिसेल.