खरंतर, अजित पवार यांनी धाराशिव जिल्ह्यातील शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि तीन टर्म आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते राहुल मोटे यांना गळाला लावलं आहे. विधानसभेत पराभव झाल्यानंतर मोटे यांनी अखेर 'तुतारी' सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी संध्याकाळी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत.
advertisement
राहुल मोटे यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे महायुतीला जिल्ह्यात बळ मिळणार आहे. मोटे यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पण अजित पवारांचा हा निर्णय येत्या काळात एकनाथ शिंदेंना अडचणीचा ठरू शकतो. कारण राहुल मोटे हे एकनाथ शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात.
अशात राहुल मोटे हे पुढील काळात भूम-परांडा मतदारसंघात तानाजी सावंत यांच्यासोबत काम करत तानाजी सावंत यांचे नेतृत्व स्वीकारणार का? की या मतदारसंघात महायुतीमध्ये नव्या संघर्षाला तोंड फुटणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण या निर्णयामुळे अजित पवार गटाची या मतदारसंघात ताकद वाढणार आहे. या प्रवेशाद्वारे अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि शरद पवार या दोघांनाही राजकीय शह दिल्याचे बोलले जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी आणि बदलते समीकरण पाहता, राहुल मोटे यांच्या निर्णयाने जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.