काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आज अमित शहा यांची सभा पार पडली. सांगलीतील शिराळा येथील सभेत बोलताना अमित शहा यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचाार सभेत विरोधी बाकावरील महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. आघाडीच्या सरकारने शिराळामध्ये बंद केलेली नागपूजा महायुतीचे सरकार सुरू करेल असे आश्वासनही त्यांनी दिले. बत्तीस शिराळाची नागपंचमी पारंपरिक आणि पहिल्यासारखीच होणार आणि कायद्याच्या पालन करत नागपंचमी सुरू होईल अशी घोषणा अमित शहा यांनी केली.
advertisement
मविआने संभाजीनगर नामकरणाला विरोध केला, शहांची टीका...
अमित शहा यांनी म्हटले की, औरंगाबादचे नाव संभाजीनगर झाले. पण महाविकास आघाडीवाले आणि महान बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे संभाजी नगरला विरोध करत आहेत. शरद पवार किती जोर लावायचा लावा, संभाजी नगर असे नाव होणारच असे अमित शहा यांनी म्हटले. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारकडून गावागावातील शेतकऱ्यांच्या जमीन वक्फ बोर्डाला दिल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आघाडी सरकार पुन्हा आल्यावर राज्यातील शेतकऱ्यांच्या जमीन वक्फ बोर्डाला दिल्या जातील असेही अमित शहा यांनी म्हटले. मात्र, महायुतीचे सरकार आल्यास असे काही होणार नाही असेही शहांनी म्हटले.
पवारांच्या चार पिढ्या आल्या तरी...
अमित शहा यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मोदींच्या सरकारने काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केले. मात्र, हे संविधानातील हे कलम पुन्हा लागू व्हावे यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांची मागणी आहे. शरद पवारांच्या चार पिढ्या आल्या तरी काश्मीरसाठी असलेले कलम 370 पुन्हा लागू होणार नाही असे शहा यांनी सांगितले. प्रभू श्रीरामाचे मंदिर अयोध्येत साकार झाले. पण, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी रामल्लाचे दर्शन घेतले नाही. आपल्या व्होटबँकेसाठी त्यांनी अयोध्येला जाणं टाळलं असल्याचा आरोपही शहा यांनी केला.
