इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ अमोल कोल्हे यांची जाहीर सभा घेतली. या सभेला संबोधित करताना अमोल कोल्हे यांनी भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांना जोरदार लक्ष्य केले.
कितीही गुलाबी जॅकेट घाला, गद्दारीचा रंग कसा लपवणार?
अमोल कोल्हे म्हणाले, इंदापुरात 23 तारखेला गुलाल तुतारीचा आहे, हर्षवर्धनभाऊंचा आहे. लोकसभेला गुलाबी जॅकेटवाले लोक विचारत होती,तुमच्याकडे काय आहे ? आमचं उत्तर होतं आमच्याकडे शरद पवार आहेत. त्यांनी कितीही गुलाबी रंग घातला तरी गद्दारीचा रंग लपणार नाही. लोकसभेत प्रत्येक जण विचारत होता, बारामतीत काय होणार पण तुम्ही तुतारी अशी जोरात वाजवली की देशात आवाज घुमला.गंमत बघा जे विकासासाठी तिकडे गेले होते, ज्यांच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केले, जे विकासावर गप्पा मारत होते त्यांना आज सागावं लागतंय बटेंगे तो कटेंगे ... आणि हे म्हणतात आम्हाला मान्य नाही, अशा शब्दात कोल्हेंनी अजितदादांचा समाचार घेतला.
advertisement
तुम्ही आमच्याकडे पोट भरायला येताय, आणि आम्हाला शिकवताय बटेंगे तो कटेंगे
तुमचे उत्तर प्रदेशवाले निम्म्यापेक्षा जास्त पोट भरायला महाराष्ट्रात येतात आणि तुम्ही आम्हाला शिकवणार बटेंगे तो कटेंगे. जे शेतकऱ्यांच्या प्रपंचात मूठ माती घालतात, त्यांना सोडायचं नाही,मग ते गुलाबी जॅकेटवाले असो नाहीतर कुणी.... असे कोल्हे म्हणाले.
न्यायप्रविष्ठ असलेलं जगाच्या पाठीवरचं एकमेव चिन्ह!
लोकसभेला पवारसाहेबांची लाट होती. आता तर त्सुनामी आलीय. जगाच्या पाठीवर एकमेव पक्ष असेल ते चिन्हावर मत मागतात पण त्या चिन्हाच्या खाली लिहावंलागतंय आमचे चिन्ह न्यायप्रविष्ठ आहे, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला. आपली तुतारी अभिमानाने मिरवायची आहे, असेही कोल्हे म्हणाले.
सरकारच येणार नाही तर शर्यत कुठली करताय
देवेंद्र फडणवीस लय हुशार माणूस आहे. ते म्हणाले 'मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही..' सरकारच येणार नाही तर शर्यत कुठली करताय, असा टोला कोल्हे यांनी फडणवीसांना लगावला.
हर्षवर्धन पाटील म्हणजे राजकारणातले राजहंस
पवार साहेबांपासून पक्ष चिन्ह एका क्षणात हिसकावून नेलं. दिल्लीतले नेते गिधाडासारखे टपून बसले होते.पण ८४ वर्षांचा योद्धा शरण गेला नाही. तुतारी अशी वाजवा, घड्याळाची टीक टीक थांबली पाहिजे. महाराष्ट्रचं पाणी काय असतं ते दाखवून द्यायची वेळ आलीय. इंदापूरच्या डोक्यावरचा लाल दिवा कायम तसाच राहिल. दणका द्या, लीड द्या हर्षवर्धन पाटलांना राज्यातला प्रमुख नेता म्हणुन निवडून द्या, असे आवाहन करीत हर्षवर्धन पाटील म्हणजे राजकारणातले राजहंस आहेत, असे कोल्हे म्हणाले.