छत्रपती शिवाजी पार्क मैदानाच्या जवळ मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे. आज सकाळी 7.30 ते 8 वाजण्याच्या सुमारास पुतळ्याच्या विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पुतळ्याच्या आजूबाजूला लाल रंग उडाला असल्याचे दिसून आले.
स्थानिक आमदार महेश सावंत यांनी सांगितले की, आज सकाळी आठ वाजण्याच्या सु्मारास आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले. त्याच वेळी पोलिसही दाखल झाले होते. महेश सावंत यांनी सांगितले की, पोलिसांच्या माहितीनुसार सकाळी 6.10 वाजेपर्यंत सगळं व्यवस्थित असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. याचा अर्थ ही घटना सकाळ 6.10 वाजल्यानंतर झाली असावी अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी दुपारपर्यंत आरोपीची माहिती समोर येणार असल्याचे सांगण्यात आले.
advertisement
वातावरण दूषित करण्यासाठी कोणीतरी हे कृत्य केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. या घटनेमागे एखादा समाजकंटक आहे की माथेफिरू आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. या घटनेची माहिती होताच खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत, माजी महापौर विशाखा राऊत, शाखा प्रमुख अजित कदम घटनास्थळी दाखल झाले. आमदार मिलिंद नार्वेकर यांनीदेखील घटनास्थळी भेट माहिती घेतली.
दरम्यान, काही वर्षांपूर्वीदेखील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक होत राज्यभरात आंदोलन केले होते.
मीनाताई ठाकरे कोण आहेत?
दिवंगत मीनाताई ठाकरे या शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी होत. शिवसैनिक त्यांना आदराने माँसाहेब असे संबोधत असे. मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकाची विचारपूस करणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था मीनाताई करत असे. शिवसैनिक आणि त्यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध होते. मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी पार्क मैदानाजवळ पुतळा उभारण्यात आला. त्यांच्या जयंती आणि स्मृतीदिनी शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमतात.