पुण्यात गणेशोत्सवाचा माहोल उत्तरोत्तर रंगत असताना आणि गणेश विसर्जन मिरवणूक काही तासांवर आलेली असताना पोलिसांच्या खाकीलाच आव्हान देत आंदेकर टोळीने वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली. एकूण १३ आरोपी सध्या अटकेत आहेत. फरार असलेला कृष्णा आंदेकरही पोलिसांना शरण आलेला आहे. सध्या पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान आरोपींची मोडस ऑपरेंडी (गुन्हा करण्याची पद्धत) काय होती, याची माहिती समोर आली आहे.
advertisement
आरोपींनी हत्येचा प्लॅन कसा रचला? चौकशीदरम्यान मोठी माहिती समोर
आंदेकर टोळीतील सदस्यांनी आयुषच्या खुनाचा कट वानवडीत रचल्याचा संशय पुणे पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केला. खून करण्यापूर्वी सदस्यांच्या अनेक वेळा वानवडी परिसरात बैठका झाल्या. महत्त्वाचे म्हणजे कोणताही पुरावा पोलिसांच्या हाताला लागू नये म्हणून आरोपी मोबाईल घरी ठेवून एकमेकांना भेट असत, असे पोलिसांच्या चौकशी दरम्यान समोर आले.
खुनाचा कट रचण्यात वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर (वय ३६) आणि कृष्णा आंदेकर याची पत्नी प्रियांका आंदेकर (वय ३२) यांचाही सहभाग होता, असे संकेत आरोपींनी पोलिसांना दिल्यानंतर गुन्हे शाखेने गुरुवारी दोघींनाही ताब्यात घेतले. गुरुवारी रात्री सोनाली आणि प्रियांका यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. सोनाली आंदेकर हिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
आयुषचा खून करण्यासाठी आरोपींनी पिस्तूल कुठून आणले, प्रत्यक्ष रेकी करण्यासाठी कोण कोण होते, रेकीसाठी कुणी कुणी मदत केली? या सगळ्याचा तपास करायचा असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी केला. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी वृंदावणी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकरसह अन्य आरोपींच्या पोलीस कोठडीत २९ सप्टेंबरपर्यंत अटक करण्यात आली आहे.