रुग्णालयात रुग्णांची ने-आण करण्यासाठी आवश्यक साधनांचा पूर्ण अभाव असल्याने दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. मृतदेहाची वाहतूक करण्यासाठी सुद्धा स्ट्रेचर नसल्याने मृतदेह झोळीत टाकून शवविच्छेदन कक्षात न्यावा लागत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. “रुग्ण असो किंवा मृतदेह, दोन्ही कपड्यात बांधूनच नेले जातात,” असे नागरिकांचे म्हणणे आहे. ही समस्या मागील अनेक वर्षांपासून सुरू असून अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही.
advertisement
Thane News : वडिलांच्या ओरडण्यामुळे मुलगा घराबाहेर पडला; नंतर जे घडलं त्याने सर्वांचा उडाला थरकाप
रुग्णालयाचा परिसरही अत्यंत अस्वच्छ अवस्थेत असल्याचे स्पष्ट होते. वाढलेली झाडी, घाण आणि कीटकांमुळे परिसरात विंचू, साप यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्ण, कर्मचारी आणि भेट देणारे नागरिक यांच्यात सतत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. गरोदर महिलांची वेळेत तपासणी न होणे, आवश्यक औषधांचा तुटवडा, डॉक्टर अनुपस्थित राहणे अशा असंख्य तक्रारी सातत्याने होत आहेत.
प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो निष्फळ ठरल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. आठवड्यात फक्त दोन दिवस अधिकारी उपस्थित राहतात, असेही सांगितले जाते. परिणामी बैठका, रुग्णालयाचे नियोजन आणि दैनंदिन व्यवस्थापन पूर्णपणे ढासळले आहे. रुग्णालयातील आवश्यक सुविधा नसल्यामुळे सामान्य रुग्णांना दिला जाणारा उपचार धोक्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
“सरकारी रुग्णालयातच सुविधा नसतील तर ग्रामीण लोकांनी जायचे कुठे?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तातडीने स्ट्रेचर, स्वच्छता साहित्य आणि आवश्यक वैद्यकीय साधने उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. सर्व स्तरांवरून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले जात असले तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. आरोग्य विभागाने तातडीने कारवाई न केल्यास आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असं स्थानिकांनी सांगितलं.






