73 वर्षाच्या आजोबांचा मृत्यू, पोलिसांना संशय, तपासातून पुढं आलं धक्कादायक कांड, परळीत खळबळ
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed Crime: सुरुवातीला ही घटना नैसर्गिक अथवा आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात आली होती, मात्र पोलिसांना संशय आल्यावर त्यांनी तपास सुरू केला होता.
बीड: परळी शहरात नातेसंबंधांनाच काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारू पिण्यासाठी तसेच मोबाईलसाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून नातवाने आजोबांना अमानुष मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील मिलिंदनगर भागात घडली. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला ही घटना नैसर्गिक अथवा आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात आली होती, मात्र पोलिसांच्या सखोल तपासात भयानक वास्तव समोर आले आहे.
मृत व्यक्तीचे नाव रामभाऊ विठ्ठल गायकवाड (वय 73) असून ते पत्नी द्रोपदाबाई गायकवाड यांच्यासह मिलिंदनगर भागात वास्तव्यास होते. त्यांचा नातू शुभम बाळू गायकवाड (वय 27) हा दारूच्या व्यसनाधीन असून तो वारंवार पैशांची मागणी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. घटनेच्या दिवशी शुभमने आजोबांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले, मात्र रामभाऊ यांनी पैसे देण्यास नकार दिला. याच रागातून शुभमने आजोबांवर लाथा-बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली.
advertisement
ही मारहाण छाती व पोटाच्या भागावर करण्यात आली होती. गंभीर दुखापतींमुळे रामभाऊ गायकवाड यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर घरातील मंडळींनी संभाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू केली. चौकशीतून नातवाने केलेल्या मारहाणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
advertisement
मृत व्यक्तीच्या पत्नी द्रोपदाबाई गायकवाड यांनी दिलेल्या सविस्तर तक्रारीनंतर संभाजीनगर पोलिस ठाण्यात नातू शुभम गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश शिंदे, संभाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय ढोणे आणि पोलिस उपनिरीक्षक अनिल शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी सर्व बाबींची बारकाईने चौकशी केली.
दरम्यान, 30 जानेवारीच्या रात्री उशिरा पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत ठाकूर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ थळकरी, पोलिस अंमलदार सुशेन पवार आणि अजय जाधव यांच्या पथकाने आरोपी शुभम गायकवाड यास ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू असून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे दारूच्या व्यसनामुळे कुटुंबांमध्ये कसे टोकाचे परिणाम घडू शकतात, याचे भयावह चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 12:14 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
73 वर्षाच्या आजोबांचा मृत्यू, पोलिसांना संशय, तपासातून पुढं आलं धक्कादायक कांड, परळीत खळबळ










