Beed News: अनैतिक संबंधाचं प्रकरण, जातपंचायत बसली; 200 रुपयांवरून वाद वाढला अन्... बीड हादरलं!
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed News: काही दिवसांपूर्वी सिरसाळा गावात एका अनैतिक संबंधाच्या संशयावरून जातपंचायत बसली होती.
बीड: अवघ्या दोनशे रुपयांच्या किरकोळ आर्थिक वादातून एका मजुराला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील सिरसाळा गावात घडली आहे. मसनजोगी वस्ती परिसरात झालेल्या या प्रकाराने संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, क्षुल्लक कारणातून घडलेली ही घटना समाजाला अंतर्मुख करणारी ठरत आहे. संजू गंगाराम उबदे (वय 40) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सिरसाळा येथील मसनजोगी वस्तीमध्ये राहणारे सायलू रामलू पस्तमवाड व गंगा पस्तमवाड यांचा संजू उबदे यांच्याशी पैशांच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. हा वाद इतका वाढला की, बोलणीतून सुरू झालेली शाब्दिक चकमक थेट धक्काबुक्कीत रूपांतरित झाली. रागाच्या भरात सायलू आणि गंगाने संजू यांना जोरदार धक्का दिला. अचानक झालेल्या या धक्क्यामुळे संजू यांचा तोल गेला आणि ते थेट तोंडावर जमिनीवर कोसळले.
advertisement
जमिनीवर आपटल्याने संजू उबदे यांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली. रक्तस्राव होत असतानाच त्यांची प्रकृती खालावली. उपस्थितांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. संजू यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा कुटुंबीयांचा परिवार असून, कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी परळी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी सायलू पस्तमवाड याच्यासह आणखी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या घटनेमागे केवळ आर्थिक वाद नसून त्याला सामाजिक पार्श्वभूमी असल्याचे तपासात पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वी सिरसाळा गावात एका अनैतिक संबंधाच्या संशयावरून जातपंचायत बसली होती. या पंचायतीत संबंधित व्यक्तींवर तब्बल 90 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. ही रक्कम समाजातील लोकांमध्ये वाटण्यात आली. मात्र, या वाटणीतील हिस्स्याचा आणि एकमेकांना दिलेल्या उसने पैशांचा हिशेब (अंदाजे 200 रुपये) यावरून संजू उबदे आणि पस्तमवाड यांच्यात वाद निर्माण झाला. हाच वाद पुढे जीवघेणा ठरला आणि एका मजुराचा निष्पाप जीव गेला.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 2:27 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Beed News: अनैतिक संबंधाचं प्रकरण, जातपंचायत बसली; 200 रुपयांवरून वाद वाढला अन्... बीड हादरलं!








