शिक्षणाचा कंटाळा, आई-वडिलांचा शोध
राजू काकासाहेब माळी (वय-24, रा. खळवट लिमगाव, ता. वडवणी) असे या मुलाचे नाव आहे. त्याचे आई-वडील ऊसतोड मजूर आहेत. 2017 साली तो 16 वर्षांचा असताना दहावीच्या वर्गात शिकत होता. शिक्षणाचा कंटाळा आणि घरच्यांच्या तगाद्याला कंटाळून तो कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला. त्यावेळी त्याचे आई-वडील कर्नाटकात ऊसतोडणीच्या कामासाठी गेले होते. त्यांना ही बातमी कळल्यानंतर गावी परत यायला आठ दिवस लागले.
advertisement
काही दिवसांत राजू परत येईल, या आशेवर त्यांनी सुरुवातीला त्याचा शोध घेतला नाही. पण पाच-सहा वर्षे उलटूनही तो परत न आल्याने अखेर 2023 मध्ये त्याच्या आईने पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला.
पुणे, गुजरातमध्ये संघर्ष
घर सोडल्यानंतर राजूने पुणे गाठले. तिथे त्याने सुरक्षा रक्षकाची नोकरी केली. त्यानंतर वेल्डिंगचे काम शिकण्यासाठी तो गुजरातला गेला. आठवड्याभरापूर्वीच तो पुन्हा पुण्यात परतला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि चौकशीच्या आधारावर त्याचे पुणे येथील लोकेशन शोधून काढले.
डोळ्यांत आनंदाश्रू
शुक्रवारी पोलिसांनी राजूच्या आई-वडिलांसह आजोबांनाही 'तपासात मदत हवी आहे' असे सांगून पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावले. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासोबत ते चर्चा करत असतानाच, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांनी राजूला अचानक त्यांच्यासमोर आणले. तब्बल आठ वर्षांनी आपल्या काळजाच्या तुकड्याला समोर पाहताच आईने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. राजूही रडू लागला, तर वडिलांनी मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. हा भावनिक प्रसंग पाहून उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचेही डोळे पाणावले.
पोलिसांच्या संवेदनशील कामगिरीचे कौतुक
या संवेदनशील कामगिरीबद्दल राजूच्या आई-वडिलांनी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर अधीक्षक सचिन पांडकर आणि तपास पथकाचे आभार मानले. हरवलेल्या मुलाला शोधून आई-वडिलांचा विश्वास सार्थ ठरवून दिल्याबद्दल बीड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हे ही वाचा : 'एकनाथ शिंदेंचा पीए' असल्याचं भासवून पती-पत्नीने 18 जणांना गंडवलं; केली 55 लाखांची फसवणूक!
हे ही वाचा : धक्कादायक! शेतीसाठी आईचा केला खून, उसाच्या फडात पुरला मृतदेह, नंतर मुलाने स्वतःही घेतला गळफास
