जालन्यातील अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंदोलकांचा जथ्था बुधवारी सकाळी मुंबईच्या दिशेने निघाला. यामध्ये हजारो मराठा आंदोलक सहभागी झाले. मुंबईत मराठ्यांच्या आंदोलनाचे वादळ 29 ऑगस्ट रोजी धडकणार आहे. तर, दुसरीकडे मनोज जरांगे यांच्याकडून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत केलेल्या बॅनरबाजीने आता यात नवा रंग भरला आहे.
advertisement
भाजप नेत्यांच्या बॅनरमध्ये काय?
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभू्मीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ लागलेल्या बॅनरवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी आपल्या वक्तव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मातोश्रींबद्दल अपशब्द वापरल्याचे सांगत भाजप नेत्यांनी जरांगेंवर टीकेची झोड उठवली होती. त्यावर जरांगे यांनी चुकून अपशब्द वापरल्यास माफी मागत असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री फडणवीसांसाठी वापरण्यात आलेल्या या अपशब्दांचा संदर्भ भाजप नेत्यांच्या बॅनरमध्ये दिसून आला आहे.
या बॅनरवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो असून "इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो" असा मजकूर लिहिलेले बॅनर झळकले आहेत. त्याशिवाय, या बॅनरमध्ये फडणवीस यांना "मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे" आणि ते उच्च न्यायालयात टिकवणारे नेतृत्व म्हणून गौरवण्यात आले आहे.
फडणवीसांवर टीका, एकनाथ शिंदे-अजित पवारांचे कौतुक...
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात झळकलेल्या बॅनरमध्ये भाजप नेते व आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील यांची नावे आहेत. ही बॅनरबाजी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झाल्याने त्याला विशेष राजकीय महत्त्व आहे. जरांगे पाटील यांनी वारंवार फडणवीस यांच्यावर केलेली टीका आणि त्यांना दिलेले आव्हान यामुळे हे बॅनर चर्चेचा विषय झाला आहे. अंतरवालीतून निघताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले. पण, त्याच वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे कौतुक केले.