ठाणे-कोकण विभागाच्या बैठकीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी स्वबळाचाच नारा दिला आहे. महायुती म्हणून तीन पक्षांनी निवडणूक लढवायला नको. भाजप म्हणूनच स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरू, असा नारा या बैठकीत देण्यात आला. भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील अशी मागणी केली.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघरसह ठाण्यातही भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणात भाजपची कामगिरी सर्वात जास्त चांगली होती. याच पार्श्वभुमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप स्वबळावर लढली तर सर्वात जास्त जास्त यश मिळेल, असा अंदाज भाजपला आहे.
advertisement
पण ठाणे-नवी मुंबईतही भाजप स्वबळावर लढलं तर हा थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान असणार आहे. त्यामुळे भाजप महायुती म्हणून लढणार की स्वबळाचा नारा देणार, याबाबत पेच निर्माण झाला आहे. स्वबळावर लढण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेतला जाईल. मात्र मित्रपक्षांसोबत टोकाचा वाद टाळण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदार - पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.