महापौर पदासाठी शिंदेंकडून भाजपवर दबाव
खरं तर, मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं एकत्रित निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपनं ८९ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान जिंकला. शिंदे गटाच्या मदतीने भाजपनं ११४ मतांचा बहुमताचा आकडाही क्रॉस केला आहे. असं असताना एकनाथ शिंदे हे सत्तेत जास्तीत जास्त वाटा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी भाजपकडे अडीच वर्षांसाठी महापौरपद मागितलं आहे. शिंदे हे किंगमेकरच्या भूमिकेत असल्याने त्यांनी भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.
advertisement
पण आता भाजपनं मुंबईत नवा डाव टाकल्याची चर्चा आहे. ते उद्धव ठाकरेंच्या मदतीने पण समर्थनाशिवाय सत्तेत बसण्याची रणनीती आखल्याचं बोललं जातंय. एकूणच शिवसेना शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवून आणि ठाकरे गटाचं समर्थन न घेता भाजपनं स्वत:चा महापौर करण्याचा डाव आखला आहे. पण बहुमत नसताना भाजपचा महापौर कसा होऊ शकतो? यामागे चक्रावून टाकणारं समीकरण समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या महापौर पदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजप मुंबईत सत्ता स्थापन करणार असेल, तर आपण त्यांना सहकार्य करू अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतल्याची माहिती आहे. महापौर निवडीच्या वेळी ठाकरे गटाचे नगरसेवक अनुपस्थितीत राहून शिंदेंना चेकमेट करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे.
शिंदे-ठाकरेविना मुंबईत भाजपचा महापौर कसा होऊ शकतो?
आता मुंबईत शिंदे आणि ठाकरे गटाची मदत न घेता भाजपचा महापौर कसा होऊ शकतो? हे पाहण्यासाठी इथं संख्याबळाचं गणित समजून घ्यावं लागेल. २२७ सदस्यसंख्या असणाऱ्या मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी ११४ हा बहुमताचा आकडा आहे. भाजपचे 89 आणि शिवसेना शिंदे गटाचे २९ असे मिळून महायुतीचं संख्याबळ ११८ इतकं होतं. पण आता एकनाथ शिंदेंनी महापौर पदासाठी भाजपवर दबाव आणायला सुरुवात केल्याने भाजप वेगळ्या पर्यायाची चाचपणी करत आहे. याचाच भाग म्हणून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याची माहिती आहे.
बहुमताचा आकडा कमी करण्याची रणनीती
दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असली तरी ठाकरे गटाकडून भाजपला थेट समर्थन दिलं जाणार नाही. महापौर पदाच्या निवडीच्या वेळी ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक गैरहजर राहणार असल्याची रणनीती आखली आहे. ठाकरेंचे ६५ नगरसेवक गैरहजर राहिले तर सभागृहातील उपस्थितीत सदस्यांची संख्या १६२ होते. अशात बहुमताचा आकडा ११४ वरून थेट ८२ वर येतो. अशा स्थितीत मुंबई महापालिकेत भाजपला स्वबळावर महापौर करता येऊ शकतो, अशीच काहीशी रणनीती आता भाजपकडून आखली जात असल्याची चर्चा आहे.
