छगन भुजबळ यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान नाकारण्यात आले होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी मेळाव्यांच्या माध्यमातून ही मनातील खदखद बोलूनही दाखवली होती. मात्र, धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भुजबळांची सरकारमध्ये मंत्री म्हणून एन्ट्री झाली.
भाजपसोबतच्या युतीबाबत काय घडलं?
भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपसोबत युती करण्याच्या चर्चांबाबतही महत्त्वाचे खुलासे केले. “शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचा विचार होता आणि त्याच वेळी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला गेला. यामध्ये शरद पवार सहभागी नसणार, असंही ठरलं होतं. भाजपसोबत युतीसाठी जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल पटेल यांच्यासह अनेक बैठकांना आम्ही हजेरी लावली. अनिल देशमुखही त्यात सहभागी होते,” असं त्यांनी सांगितलं.
advertisement
तर, मी मंत्रिपदाचा राजीनामा देणार....
छगन भुजबळ यांनी राजीनाम्याबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळाल्यानंतर भुजबळ म्हणाले, “मला सन्मानाने परत बोलावण्यात आलं, त्यासाठी मी आभारी आहे. मात्र जर धनंजय मुंडेंना सर्व आरोपांतून मुक्तता मिळाली, त्यांना क्लीनचिट मिळाली, तर मी स्वतःहून माझं मंत्रिपद सोडून देईन.” त्यांनी स्पष्ट केलं की, मुंडेंना मंत्रिमंडळात परत घेण्यावर आपल्याला कोणतीही हरकत नाही, पण आपल्या भूमिकेबाबत आपण ठाम आहोत, असेही त्यांनी म्हटले. मंत्रिपद न मिळाल्याच्या काळात ते उपमुख्यमंत्री अजित पवारांशी अबोला ठेवून होतो, असेही भुजबळांनी सांगितले.