आरोपीचा 7 पानी लेटरबॉम्ब
छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुलाच्या 21.59 कोटींचा घोटाळा करून पळून गेलेल्या आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याने पोलिसांना 7 पानांचे पत्र पाठवले आहे. या पत्रात त्याने बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरूनच मी हा निधी लंपास केल्याचा दावा केला आहे. कोट्यवधींचा घोटाळा करून पसार झालेल्या हर्षकुमार क्षीरसागर याची मैत्रीण अर्पिता वाडकर हिला पोलिसांनी नवी मुंबईच्या कोपरखैरणे भागातून अटक करण्यात आली. हर्षकुमारच्या आणखी संपत्ती आणि घोटाळ्याच्या रकमेबाबत तिच्याकडून मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे.
advertisement
अवघ्या 11 महिन्यांत 21.59 कोटींचा घोटाळा करणाऱ्या हर्षकुमारने अर्पिताला देखील या घोटाळ्यात भागीदार केले होते. आरोपीने गिफ्ट म्हणून विमानतळासमोरील उच्चभ्रू सोसायटीमध्ये अर्पिताच्या नावाने दीड कोटी रुपयांचा अल्ट्रा लक्झरियस फ्लॅट खरेदी केला होता.
>> आरोपींने आपल्या पत्रात काय म्हटले?
आरोपी हर्षकुमार क्षीरसागरने आपल्या पत्रात म्हटले की, माझे वरिष्ठ आणि विभागीय क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांनी माझ्यामार्फत हा निधी घेतला. यात बँकेचे अधिकारी देखील सहभागी होते. शहरात आल्यानंतर बीड बायपासवरील हॉटेल बुकिंग करण्यापासून सर्व व्यवस्था करण्याचा ते आदेश देत होते. अमरावतीच्या भेटीत त्यांनी मला पिस्तुलाने जिवे मारण्याची धमकी दिली होती. आम्ही सांगू तसेच वागण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला. त्यानंतर ई-मेल आयडीमध्ये बदल करत मी 6 जूनपासून रोज 10 लाख रुपये काढण्यास सुरुवात केली. पुढे ही 15 लाख रुपयांपर्यंत रक्कम वाढली. त्या पैशातून त्यांनीच मला आणि माझ्या कुटुंबाच्या नावावर आलोकनगर आणि अन्य ठिकाणी फ्लॅट घ्यायला लावले.
चौकशीला तयार....
महागड्या कार, 40 लाखांचे दागिने, हिऱ्यांचा 35 लाखांचा चष्मा घ्यायला लावला. तो मोडल्याने सध्या ऑप्टिकलमध्ये आहे. मी चौकशीला तयार आहे. तुम्ही माझ्या नावावरची संपत्ती विकून सर्व निधी परत मिळवू शकता, असे देखील आरोपी हर्षकुमार क्षीरसागरने आपल्या पत्रात म्हटले आहे.
