या प्रकरणी 32 वर्षीय विवाहितेने छत्रपती संभाजीनगर येथील छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पती गणेश गायकवाड याच्यासह त्याच्या कुटुंबातील आणि नातेवाइकांसह एकूण 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये सासू सुनंदा गायकवाड, दीर पंकज गायकवाड, जाऊ पूनम पंकज गायकवाड, नणंद योगीता अशोक शिंदे, संगीता आशिष माळी, अंजली मुकेश मंडलीक, नणंदेचा पती आशिष माळी, मुकेश मंडलीक, मावस सासरा संजय जेजूरकर, मामा गोरख जगताप आणि मावस भाऊ भगवान जेजूरकर यांचा समावेश आहे.
advertisement
फिर्यादी महिलेनुसार, तिचा विवाह 20 मे 2025 रोजी गणेश गायकवाड याच्याशी झाला. विवाहानंतर पतीने ‘नवस केला आहे’ असे सांगत शारीरिक संबंध टाळण्यास सुरुवात केली. महिनाभर उलटूनही संबंध न झाल्याने तिने वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाण्याचा आग्रह धरला. मात्र त्यावर पतीने मारहाण करत मानसिक छळ सुरू केला. सासरच्या मंडळींना सर्व बाबी माहीत असूनही त्यांनी पीडितेला गप्प राहण्यास सांगितल्याचा आरोप आहे.
यानंतर सासरच्या मंडळींनी नाशिक येथे फ्लॅट घेण्यासाठी 15 लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय शारीरिक संबंध होणार नाहीत, असे स्पष्टपणे सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. ही बाब माहेरच्यांना सांगितल्यानंतर पीडितेचा भाऊ पतीला समजावण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करून घराबाहेर काढण्यात आले. तसेच पीडितेला उपाशी ठेवून बंदिस्त करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
पीडितेने पतीचे त्याच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. याबाबत विचारणा केल्यानंतर 22 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री तिच्यावर जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिला अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी तिला घराबाहेर हाकलून देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, सासरच्या मंडळींनी पीडितेचे सोन्याचे दागिने आणि शैक्षणिक कागदपत्रे जबरदस्तीने काढून घेतली. नातेवाईकांच्या मध्यस्थीने 5 लाख रुपये देण्यात आले आणि पतीच्या वैद्यकीय उपचारांचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यानंतरही मारहाण, धमक्या आणि मानसिक छळ थांबला नाही. 6 सप्टेंबर 2025 रोजी पुन्हा तिच्यावर मारहाण करण्यात आली.
पीडिता माहेरी आल्यानंतरही सासरच्यांनी तिच्या आई-वडिलांच्या घरी जाऊन शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे. पुढे दोन्ही कुटुंबांमध्ये बैठक झाली असता पती वैद्यकीय तपासणीस तयार असल्याचे सांगून तिला पुन्हा नांदायला नेण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कोणताही उपचार न करता पुन्हा तिचा छळ सुरू करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार सय्यद हे करीत आहेत.






