भाऊसाहेब कचरू गंडे (65) हे करंजगावातील गंडेवस्तीवर आपल्या आई लक्ष्मीबाई (90), पत्नी आणि मुलाबाळांसह राहत होते. गेली पाच वर्षे ते अर्धांगवायू आजाराशी झुंज देत होते. कुटुंबीय त्यांची काळजीपूर्वक सेवा करत असतानाच बुधवारी पहाटे पाच वाजता त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झाले. या अनपेक्षित धक्क्याने कुटुंबावर शोककळा पसरली.
advertisement
मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच वृद्ध आई लक्ष्मीबाई यांना धक्का बसला. आयुष्यभर जपलेल्या लेकराचा असा अकस्मात मृत्यू या वयात त्यांना सहन होत नव्हता. अवघ्या सहा तासांत, म्हणजे दुपारी पावणे बारा वाजता त्यांनीही जीवनयात्रा संपवली.
एकाच दिवशी मायलेकाचा मृत्यू झाल्यामुळे गंडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत; लोक एकच वाक्य बोलताना दिसतात, “माय-लेकाचं नातं स्वर्गातही तुटत नाही.” लक्ष्मीबाई यांच्या पश्चात चार मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. परंतु या दुर्दैवी घटनेने संपूर्ण करंजगाव शोकात बुडाले आहे.






