शहरातील क्रांती चौक, रेल्वे स्टेशन परिसर, तसेच उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या कॅनॉट प्लेस या भागांमध्ये हे नेटवर्क बिनबोभाटपणे कार्यरत आहे. या टोळीशी संपर्क साधल्यानंतर दलालांनी थेट “रेट” सांगत भीक मागणाऱ्यांची उपलब्धताही दर्शवली. विशेष म्हणजे 24 तास पोलिसांचा बंदोबस्त असलेल्या क्रांती चौकातही हे रॅकेट निर्भयपणे सुरू असल्याचं स्पष्ट झालं.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार हे संपूर्ण जाळं भिक्षुकी प्रतिबंधक कायदा 1959 अंतर्गत स्पष्टपणे बेकायदेशीर आहे. त्यातच, भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर केल्याने बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 – कलम 76 लागू होत असून, त्यामध्ये पाच वर्षांपर्यंत कठोर कारावासाची तरतूद आहे. शिवाय, मुलांना भाड्याने देण्याचा प्रकार भारतीय न्याय संहिता (मानवी तस्करी) अंतर्गत गंभीर गुन्हा मानला जातो, ज्यात जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते.
advertisement
दिवसभरात मिळालेली रक्कम ही बहुतांशी नाणी किंवा 10–20 रुपयांच्या नोटांमध्ये असते. हे पैसे परिसरातील काही निश्चित व्यापाऱ्यांकडे नेले जातात. तेथे सुट्ट्या पैशांच्या बदल्यात 50 किंवा 100 रुपयांच्या नोटा घेतल्या जातात. या प्रक्रियेत भिकाऱ्यांमधील एखादा पुरुष काही नोटा स्वतःकडे ठेवतो, तर उरलेली रक्कम कंत्राटदारापर्यंत पोहोचवली जाते. रस्त्याच्या कडेला खेळणी विकणाऱ्या काही व्यक्तींमार्फत ही पैशांची देवाणघेवाण केली जात असल्याचंही निदर्शनास आलं आहे.
महिलांचा भीक मागण्यासाठी, पुरुषांचा चोरीसाठी वापर या रॅकेटमध्ये सहभागी असलेले बहुतांश लोक राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश येथून आलेले आहेत. महिलांना भीक मागण्यासाठी पुढे केलं जातं, तर त्यांच्याच कुटुंबातील किंवा टोळीतील पुरुष मोबाइल चोरी, पाकीटमारी यांसारख्या गुन्ह्यांत सक्रिय असतात. चोरी केलेली पाकीट किंवा साहित्य इतर ठिकाणी पोहोचवण्यासाठी महिलांचा वापर केला जातो, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
शहरातील वसंतराव नाईक चौक (सिडको), सेव्हन हिल्स आणि क्रांती चौक हे या रॅकेटचे प्रमुख केंद्रबिंदू आहेत. या ठिकाणचे सिग्नल 90 सेकंदांहून अधिक काळ चालतात, त्यामुळे वाहनधारकांशी अधिक वेळ संवाद साधून त्यांना भावनिक करून पैसे मिळवता येतात. याशिवाय, जिथे नागरिक जास्त वेळ थांबतात अशा कॅनॉट प्लेस, निराला बाजार आणि दोन्ही बसस्थानकांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जातं. एखादी व्यक्ती तासभर एका ठिकाणी उभी राहिली, तर तोच भिकारी तीन वेळा त्याच व्यक्तीकडे येतो, असं निरीक्षणात आढळून आलं आहे.
दरम्यान, शहरभर हा प्रकार सर्रास आणि उघडपणे सुरू असल्याचं चित्र समोर येत असून, यामागील संपूर्ण नेटवर्कवर कठोर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे.






