न्यायमूर्ती अर्चना मेढेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एम. पी. विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी कॅनडातील यॉर्क विद्यापीठाच्या ऑसगुड हॉल विधी विद्यालयातून कायद्याची पदव्युत्तर पदवी संपादन केली. सन 2004 मध्ये त्यांना ऑन्टारियो बारमध्ये प्रवेश मिळाला. पुढील काळात त्यांनी कुटुंब कायदा, कॉर्पोरेट कायदा तसेच स्थलांतर कायदा या क्षेत्रांत प्रभावी कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
advertisement
वय वर्ष 15, आई-वडिलांनी ठरवलं लग्न, मुलीनं केलं असं, प्रशासनाची पळापळ, ZP शाळेत काय घडलं?
सन 2008 मध्ये त्यांनी स्वतःची स्वतंत्र विधी फर्म स्थापन केली. वकिली करत असताना त्यांनी केवळ व्यावसायिक यश मिळवले नाही, तर 350 हून अधिक तरुण क्लायंटना न्याय मिळवून देत सामाजिक बांधिलकीही जपली. न्यायासाठी ठाम भूमिका, सखोल अभ्यास आणि संवेदनशील दृष्टिकोन यामुळे त्या कॅनडातील विधी क्षेत्रात परिचित नाव ठरल्या. न्यायमूर्ती मेढेकर या केवळ न्यायालयीन कामापुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत. त्या यॉर्क विद्यापीठ आणि ग्वेल्फ–हंबर विद्यापीठात अध्यापनाचे कार्यही करतात. त्यामुळे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी त्या प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
कॅनडाच्या मुख्य न्यायाधीश शेरोन निकलस यांनी त्यांची न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर आता न्यायमूर्ती अर्चना मेढेकर फोर्ट फ्रान्सिस आणि केनोरा येथील न्यायालयांमध्ये न्यायदानाचे महत्त्वाचे कार्य पार पाडणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या लेकीने परदेशातील न्यायव्यवस्थेत मिळवलेले हे मानाचे स्थान, मराठी समाजासाठी गौरवाची आणि प्रेरणादायी यशोगाथा ठरली आहे.






