शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उंडणगावहून मक्याचे पैसे घेऊन येत असताना तुकाराम गव्हाणे यांचे पाच जणांनी अपहरण केले. चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळील एक लाख रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर गव्हाणे कुटुंबियांकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. सुरुवातीला आरोपींनी स्वतःच्या मोबाईलवरून फोन करून खंडणीची मागणी केली आणि नंतर तो मोबाईल बंद केला. पुढे अपहृत गव्हाणे यांच्या मोबाईलवरूनच कुटुंबियांशी सातत्याने संपर्क साधण्यात आला.
advertisement
रविवारी सकाळी सुमारे दहा वाजता गव्हाणे यांचा मोबाईल सुरू झाला. त्याच फोनवरून त्यांनी मुलगा कृष्णा याला कॉल करून तातडीने एक कोटी रुपये घेऊन छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकावर येण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी वारंवार लोकेशन बदलत बसस्थानक, सेंट्रल नाका, कलेक्टर कार्यालय, टीव्ही सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बाबा पेट्रोल पंप अशा विविध ठिकाणी पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्यामुळे कृष्णा पाटील, नातेवाईक आणि पोलिस वेगवेगळ्या वाहनांतून हालचाल करत होते.
दरम्यान, खंडणीची रक्कम वेळेत मिळत नसल्याने संतापलेल्या आरोपींनी रविवारी रात्री नऊच्या सुमारास तुकाराम गव्हाणे यांना कारमधून चाळीसगाव घाटातील म्हसोबा मंदिराजवळ नेले. तेथे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नायलॉन दोरीने हात-पाय बांधून मृतदेह दरीत फेकून देण्यात आला.
पोलिसांनी असं पकडलं
खून केल्यानंतर आरोपी छत्रपती संभाजीनगर परिसरात आले. समृद्धी महामार्गावरील सावंगी टोलनाका परिसरातून त्यांनी गव्हाणे कुटुंबियांना रात्री नऊ वाजता फोन केला आणि “आता आम्हाला तुमचे पैसे नको, ते पैसे परत घेऊन जा,” असे सांगून फोन कट केला. हाच क्षण साधत पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे सापळा रचला आणि चार आरोपींना रंगेहाथ पकडले.
या कारवाईत सचिन नारायण बनकर (25), वैभव समाधान रानगोते (23, दोघे रा. गोळेगाव), अजिनाथ उर्फ अजय रखमाजी सपकाळ (22, रा. पालोद) आणि विशाल साहेबराव खरात (23, रा. पानवडोद) यांना सावंगी टोलनाक्यावर अटक करण्यात आली. पाचवा आरोपी दीपक कन्हैयालाल जाधव (25, रा. लिहाखेडी) याला नंतर गावातून अटक करण्यात आली.
गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून खुनासाठी वापरलेला चाकू, छऱ्याची पिस्तूल, मयताकडून लुटलेले 80 हजार 500 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली. तपासादरम्यान घाटातील म्हसोबा देवस्थानापासून सुमारे 500 फूट अंतरावर गव्हाणे पाटील यांचा रक्ताने माखलेला बूट आढळून आला. त्यानंतर दरीत मृतदेह सापडला.
वकिलांनी वकीलपत्र नाकारले
या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार सचिन बनकर असून काही दिवसांपूर्वी त्याचा तुकाराम गव्हाणे यांच्यासोबत पैशांच्या व्यवहारातून वाद झाला होता. त्या वादातूनच बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने साथीदारांसह अपहरण व खंडणीचा कट रचल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ही घटना अत्यंत क्रूर व निंदनीय असल्याचे सांगत सिल्लोड वकील संघाने आरोपींचे वकीलपत्र घेण्यास नकार देण्याचे आवाहन केले. त्यानंतर कोणत्याही वकिलाने वकीलपत्र न घेतल्याने न्यायालयाने आरोपींना सरकारी वकील उपलब्ध करून दिला.
तुकाराम गव्हाणे पाटील हे 93 एकर शेतीचे मालक असून भुसार मालाचे मोठे व्यापारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. रविवारी रात्री बोदवड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.






