अहिल्यानगरमधील 29 वर्षीय शेतकरी लग्नासाठी वधूच्या शोधात होता. ही संधी साधून रस्ता कामावरचा सुपरवायझर अरविंद राठोड याने या तरुणाशी संपर्क साधला. "माझ्या गावची मुलगी आहे, तिचे वडील नाहीत, ती आई-भावासोबत राहते आणि कंपनीत नोकरी करते," अशी खोटी माहिती देऊन त्याने तरुणाचा विश्वास संपादन केला. त्याने व्हॉट्सअॅपवर माया शिंदे नावाच्या मुलीचा फोटो पाठवला. तरुणाने तिला पसंत केले. याच वेळी राठोडने लग्नासाठी 'स्त्रीधन' म्हणून थेट 3 लाख रुपये द्यावे लागतील, अशी अट ठेवली. मुलगी आवडल्यामुळे तरुणाने या टोळीवर विश्वास ठेवला आणि पैसे देण्यास तयार झाला.
advertisement
सासू-सुनेचं कांड वाचलं, तर डोकं फिरल, अवघ्या तीन तासात..., 9 महिलांची तक्रार!
मुलगी बघण्याचा कार्यक्रम
30 नोव्हेंबर रोजी तरुण आपल्या कुटुंबीयांसोबत बजाजनगर येथील मायाच्या घरी पोहोचला. मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर दोन्ही कुटुंबांनी 'पसंती' दर्शवली. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी तरुणाला विश्वासात घेण्यासाठी एक मोठी चाल खेळली. छत्रपती संभाजीनगर येथील कोर्टात जाऊन त्यांनी 100 च्या स्टॅम्प पेपरवर नवरदेव आणि नवरीच्या संमतीने लग्न करत असल्याची नोटरी करून घेतली. यामुळे तरुणाला आपली फसवणूक होत असल्याचा संशयही आला नाही.
नोटरी झाल्यावर, ठरल्याप्रमाणे तरुणाने 3 लाख (रोख आणि यूपीआयद्वारे) मायाची आई सविता शिंदे हिला दिले. पैसे मिळाल्यावर लगेचच आईने, "तुम्ही आजच मुलीला घेऊन जा आणि उद्या गावी लग्न लावा," असा सल्ला दिला. तरुण आणि त्याचे कुटुंबीय नियोजित वधू माया शिंदे हिला घेऊन आपल्या कारमधून घराच्या दिशेने निघाले. काही अंतरावर जाताच, मागून भरधाव वेगाने एक पांढऱ्या रंगाची, विनाक्रमांकाची 'आय-ट्वेंटी' कार आली. त्या कारच्या चालकाने ओव्हरटेक करत त्यांची गाडी रस्त्यात आडवी लावली. या गाडीत चार अज्ञात लोक होते.
कार आडवी आली अन्...
कुणाला काही समजण्याच्या आतच, नवरी माया शिंदे कारमधून उतरली आणि काही क्षणांत आडवी लावलेल्या दुसऱ्या कारमध्ये जाऊन बसली. लगेच ती कार वेगाने निघून गेली. हे पाहून गाडीतील सर्वांनाच मोठा धक्का बसला.
धक्कादायक प्रकार घडल्यानंतर तरुणाने लगेच मायाला फोन केला, पण तिचा फोन बंद होता. तो तिच्या बजाजनगर येथील घरी गेला असता, तिथेही कोणीच नव्हते आणि तिची आई सविता शिंदे हिचाही फोन बंद होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, हताश झालेल्या तरुणाने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी अरविंद राठोड, बुड्डा राठोड, सविता शिंदे आणि माया शिंदे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, टोळीचा शोध सुरू आहे.






