जवाहरनगर परिसरातील कुलकर्णी दाम्पत्याच्या डिश टीव्हीमध्ये 14 ऑक्टोबर रोजी समस्या निर्माण झाली. त्यांनी गुगलवर हेल्पलाइन क्रमांक शोधला. त्याचदरम्यान अज्ञात व्यक्तीने स्वतःला कंपनीकडून असल्याचे सांगत कॉल केला. त्याने ‘फक्त 5 रुपये फी भरा’ असे सांगून बँक खाते क्रमांक आणि ओटीपी विचारला. काही क्षणांत त्यांच्या खात्यातून 95 हजार रुपये वळते झाले.
दिवाळीची खरेदी केली अन् घरी परतताना नको ते घडलं, पतीनं जग सोडलं, पत्नी...
advertisement
रक्कम परत मिळेल या बहाण्याने फसवणूक करणाऱ्याने त्यांच्या पत्नीचे बँक खाते तपशीलही घेतले आणि एक मोबाइलचा ताबा घेणारे ॲप (APK फाइल) इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांचा फोन पूर्णतः सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात गेला आणि आणखी 1.35 लाख रुपये खात्यातून वळते झाले.
कुलकर्णी दाम्पत्य तरीही घाबरले नाही. त्यांनी तात्काळ आपल्या नातेवाइकांना आणि पोलिसांना संपर्क केला. सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सचिन कुंभार आणि अंमलदार मारोती गोरे यांनी तत्काळ हालचाल केली. सायबर फसवणुकीचे ॲप हटवून एसबीआय बँकेशी संपर्क साधला. पोलिसांच्या तत्परतेमुळे सुमारे दोन लाख रुपये गोठवण्यात आले आणि उर्वरित रक्कमही जाण्यापासून वाचवण्यात यश आले.
काय असतो ‘गोल्डन अवर’?
फसवणूक घडल्यानंतरचा पहिला तास म्हणजेच गोल्डन अवर होय. या काळात विविध कारणांमुळे तो अत्यंत निर्णायक ठरतो.
ऑनलाइन व्यवहारांचे डिजिटल पुरावे (IP ॲड्रेस, ट्रान्झॅक्शन आयडी, लॉगइन डिटेल्स) काही तासांत नष्ट होतात.
फसवणूक झालेली रक्कम गुन्हेगारांच्या खात्यात पोहोचण्यापूर्वीच बँक व्यवहार गोठवता येतात.
सायबर गुन्हेगार अनेकदा पैशांची रक्कम तासाभरात वेगवेगळ्या खात्यांत वळवतात; तात्काळ कारवाई केली तर ती साखळी थांबवता येते.
आरबीआय आणि केंद्र सरकारच्या सायबर यंत्रणांनाही या तासात केलेली तक्रार त्वरित प्रतिसादासाठी मदत करते.
फसवणूक होताच काय कराल?
लगेच 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर कॉल करा.
www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.
जवळच्या पोलीस ठाण्यात तात्काळ संपर्क साधा.
आपल्या मोबाइल आणि इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड त्वरित बदला.
कुलकर्णी दाम्पत्याच्या तत्परतेने दाखवले की सायबर फसवणुकीत “गोल्डन अवर” म्हणजे केवळ एक तास नव्हे, तर जीवनभराच्या बचतीला वाचवण्याची वेळ असते.