'तूने मेरी फ्रेंड से बात क्यूं की,' असे म्हणत फॉर्च्यूनरमधून आलेल्या तिघांनी एका विद्यार्थ्याला पिस्तूल रोखून रॉडने मारले. ही घटना बुधवारी (26 नोव्हेंबर) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास सलीम अली सरोवरामागे घडली. या प्रकरणात एका आरोपीला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.
अनुदान नावालाच, हा तर भामट्यांचा डाव, वृद्ध महिलेसोबत असं घडलं, छ. संभाजीनगरात खळबळ
advertisement
बुधवारी सलीम अली सरोवरच्या पाठीमागे एका कन्स्ट्रक्शन साइटवर समीर (नाव काल्पनिक आहे) मित्रांसोबत बोलत उभा होता. तेथे फॉर्च्यूनरमधून (एमएच 12 यूसी 7545) आरोपी आले. त्याच्यातील एकाने 'तूने मेरी फ्रेंड से बात क्यूं की,' असा जाब विचारला आणि मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्याने पिस्तूल रोखून, 'आज तुझे खतम कर दूंगा,' अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या समीरने तेथून पळ काढला व समीर जवळच असलेल्या एसबीएच कॉलनीत पार्किंगमध्ये लपून बसला. तेथून वडिलांना फोन करून ही घटना सांगितली. समीरचे वडील आणि मित्र त्याला घेण्यासाठी आले. त्यानंतर सिटी चौक पोलीस ठाण्यात गेले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी आणि फिर्यादी (पीडित) दोघेही एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहावीपर्यंत एकत्र शिकले होते. एका मैत्रिणीवरून त्यांच्यात वाद होता, जो या मारहाणीला कारणीभूत ठरला. मित्राला मारहाण करण्यासाठी मुख्य आरोपीने एका आरोपीला पिस्तूल आणि दुसऱ्या आरोपीला रॉड घेऊन येण्यास सांगितले होते, तर तिसऱ्याला फॉर्च्यूनर घेऊन येण्यास सांगितले होते. या मारहाणीत सहभागी असलेले इतर दोघे आरोपी भाडोत्री असावेत, असा पोलिसांना संशय आहे. पोलीस या दोघांचा कसून शोध घेत आहेत.






